विक्रमी पावसामुळे ऑगस्टमध्ये मान्सून तूट संपुष्टात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 07:33 IST2025-09-01T07:33:25+5:302025-09-01T07:33:25+5:30
या पार्श्वभूमीवर पुढील सहा दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

विक्रमी पावसामुळे ऑगस्टमध्ये मान्सून तूट संपुष्टात
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे मान्सूनची तूट पूर्णपणे भरून निघाली असून ७ टक्के अतिरिक्त पाऊस नोंदवण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात जवळजवळ अडीच आठवडे पाऊस पडला नव्हता, ज्यामुळे सरासरी मान्सूनची तूट १३ टक्क्यांपर्यंत वाढली होती. परंतु शेवटच्या आठवड्यात तब्बल १४ इंच पाऊस पडला. यापैकी २८ ऑगस्टच्या सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांत विक्रमी ६.२ इंच इतका पाऊस पडला.
मागील सहा दिवस व त्यापूर्वीच्या काही दिवसांचा अपवाद वगळता ऑगस्ट महिना पावसाविनाच गेला होता. जून महिन्यात ३० इंच, जुलै महिन्यात ४८ इंच, तर ऑगस्टमध्ये ३४ इंच पाऊस नोंदला. त्यामुळे एकूण हंगामी पाऊस ११३.५ इंच असल्याचे नोंदवले गेले आहे. सप्टेंबर महिना हा पावसाळ्याचा शेवटचा महिना आहे. या महिन्यात अवघे ५ इंच पाऊस पडला तरी राज्यात हंगामी पावसाची सरासरी पार होणार आहे.
या पार्श्वभूमीवर पुढील सहा दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ६ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाच भागांमध्ये हंगामी सरासरी पावसाचे प्रमाण पार झाले आहे. राज्यात १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ११८.५ इंच पाऊस पडतो. पावसाळ्याच्या समाप्तीस महिना शिल्लक आहे.