आमदार प्रवीण आर्लेकर, आजगावकर यांना दिली समज: दामू नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 12:47 IST2025-07-03T12:46:31+5:302025-07-03T12:47:19+5:30

निवडणुकीवेळी वर्तनाचा विचार होणार

mla pravin arlekar and baburao ajgaonkar given warning said damu naik | आमदार प्रवीण आर्लेकर, आजगावकर यांना दिली समज: दामू नाईक

आमदार प्रवीण आर्लेकर, आजगावकर यांना दिली समज: दामू नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : ड्रग्सच्या विषयावरून परस्परांवर आरोप करणारे पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर व माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर या दोघांना आपण समज दिली आहे. २०२७च्या विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी देताना प्रत्येकाच्या वर्तनाचा विचार पक्ष करेल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

आमदार आर्लेकर व माजी उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी एकमेकांवर गांजा विक्री केल्याचा आरोप केला आहे. हे आरोप त्यांनी वैयक्तिक केले असले तरी पक्षावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पक्षावर परिणाम होऊ नये, अशी ताकीद दोघांनाही दिल्याचे त्यांनी सांगितले.

नाईक म्हणाले, की ज्या - ज्या वेळी पक्षासंदर्भात अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, तेव्हा आपण योग्यवेळी त्याला उत्तर देतो. आर्लेकर व आजगावकर या दोघांशीही मी बोललो आहे. ते एकमेकांवर आरोप करीत असले तरी त्याचा परिणाम पक्षावर होता कामा नये. त्यामुळे पुन्हा असे घडू नये, म्हणून त्यांना ताकीद दिली आहे. अमली पदार्थावरून ते आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे याविषयी काही माहिती असेल तर तुम्ही थेट जाऊन तक्रार करावी, असेही आपण दोघांना सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. नाईक म्हणाले की, 'दोघांच्याही वर्तनाची पूर्ण दखल घेतली जाईल. आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी देताना प्रत्येकाच्या वर्तनाचा विचार पक्ष करेल. चव्हाट्यावर भांडण केल्याप्रमाणे करू नये. अशा प्रकारच्या गोष्टी पुन्हा घडू नयेत याची समज दिली आहे.

गैरसमज पक्षाकडे मांडा

दोघांनीही लहान मुलांप्रमाणे भांडू नये. ते योग्य व्यासपीठ नव्हे. जर काही समज-गैरसमज असतील तर त्यांनी मुख्यमंत्री तसेच पक्षाकडे ते मांडावेत असेही नाईक यांनी आमदार आर्लेकर व माजी आमदार आजगावकर यांना सांगितले आहे.

पेडणे भाजप म्हणजे 'गांजा पार्टी'; आमदार विजय सरदेसाई यांची टिप्पणी

पेडणेचे माजी आमदार, माजी मंत्री बाबू आजगावकर आणि विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर हे दोघेही सध्या एकाच पक्षात आहेत. हे दोघेही गांजाचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी स्पर्धा करत आहेत, < असा आरोप गोवा फॉरवर्डचे नेते आमदार विजय सरदेसाई यांनी केला. पेडणे भाजप म्हणजे गांजा पार्टी झाल्याची टीकाही सरदेसाई यांनी केली. बुधवारी पणजीतील महालक्ष्मी मंदिरात देवीच्या दर्शनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार सरदेसाई म्हणाले की, पेडणे तालुक्यात गांजाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तेथील आमदार भाजपचे आहेत. त्यामुळेच गांजा वाढला आहे. त्यामुळे पेडणे भाजप म्हणजे भारतीय गांजा पार्टी झाली आहे. बाबू आजगावकर यांनी मंत्री असताना राज्यात गांजा कायदेशीर करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, मी त्याला तीव्र विरोध केला होता.
 

Web Title: mla pravin arlekar and baburao ajgaonkar given warning said damu naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.