लोबो, शिरोडकर, राणे दिल्लीत; मुख्यमंत्र्यांची अमित शाहांशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:20 IST2025-07-01T13:18:55+5:302025-07-01T13:20:22+5:30
मुख्यमंत्री सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर हे दिल्लीत आहेत, पण ते एकत्र गेलेले नाहीत.

लोबो, शिरोडकर, राणे दिल्लीत; मुख्यमंत्र्यांची अमित शाहांशी चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोव्यातील मंत्रिमंडळात तातडीने बदल होणार नाहीत. विधानसभा अधिवेशन याच महिन्यात सुरू होणार असल्याने लवकरच मंत्रिमंडळाची फेररचना होणार नाही. तथापि, मोठे बदल नंतर होतीलच. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची गृहमंत्री अमित शाह यांच्याशी काल बैठक झाली. आमदार मायकल लोबो यांनीही मुख्यमंत्र्यांसोबतच शाह यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर हे दिल्लीत आहेत, पण ते एकत्र गेलेले नाहीत. ते स्वतंत्रपणे दिल्लीत गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या बैठका अगोदरच ठरल्या होत्या. मंत्री शिरोडकर हे सरकारी कामकाजानिमित्त दिल्लीत आहेत. कळंगुटचे आमदार लोबो व मुख्यमंत्री सावंत हे एकत्रपणे रात्री गृहमंत्री शाह यांना भेटले. त्यांच्यात बराचवेळ चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांचीही भेट घेतली.
शाह यांना भेटल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून अधिकृतपणे ट्विट करण्यात आले, त्यात मुख्यमंत्र्यांनी शाह यांच्याकडे विकासाच्या प्रमुख मुद्यांसह गोव्यातील राजकीय परिस्थितीबाबतही चर्चा केल्याचे म्हटले आहे. गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर नवीन मंत्री अद्याप घेतलेला नाही. तसेच एकूणच मंत्रिमंडळाची फेररचना व खातेबदलही रखडलेला आहे. काल लोबो यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांनी शाह यांची भेट घेतल्याने वेगवेगळे तर्क काढले जात आहेत. लोबो यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मंत्री बनून मला वाहतूक खाते मिळाल्यास टॅक्सी प्रश्न सोडविन, असे सभापती रमेश तवडकर म्हणाले. गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर आता एसटी समाजाच्याच नेत्याला मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून तवडकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जाते. पत्रकारांनी यासंबंधी तवडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, मला अजून कोणतीच माहिती दिलेली नाही. टॅक्सीवाल्यांच्या प्रश्नावर विचारले असता तवडकर म्हणाले की, टॅक्सी व्यावसायिक इतर आमदारांना आपल्या मागण्या घेऊनभेटतात तसेच मलाही काहीजण भेटले. टॅक्सी विषय हा वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यातील विषय आहे. त्याबद्दल मी भाष्य करु इच्छित नाही. दरम्यान, नंतर एका प्रश्नावर ते म्हणाले की, मंत्रिपद मिळून वाहतूक खाते माझ्याकडे आले तर मी टॅक्सी विषय सोडवण्याचा प्रयत्न करीन.
सिक्वेरांशी दीड तास चर्चा
दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी इस्पितळात उपचारार्थ दाखल असलेले पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांची भेट घेऊन विचारपूस केली. सिक्वेरा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी दीड तास चर्चा केली, मात्र यात कोणताही राजकीय विषय नव्हता. मी पुढील सप्ताहात गोव्यात येणार असून विधानसभा अधिवेशनात माझ्या खात्याच्या प्रश्नांची उत्तरेही देणार. माझे मंत्रिपद ठेवायचे की नाही हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे.