म्हादईचे पाणी आटलेय, अनेक फोटो सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 18:42 IST2020-03-03T18:42:15+5:302020-03-03T18:42:54+5:30
मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी ही छायाचित्रे मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सादर केली.

म्हादईचे पाणी आटलेय, अनेक फोटो सादर
पणजी : म्हादई नदीचे पाणी आटले असल्याचे दाखवून देणारी छायाचित्रे सोमवारी म्हादईच्या खो:यात जाऊन टीपली गेली आहेत. मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी ही छायाचित्रे मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सादर केली. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी संयुक्त पाहणी करूया असे आश्वासन गोव्याच्या शिष्टमंडळाला काही महिन्यांपूर्वी दिले होते, त्याचे पालन केले जावे, अशी मागणी ढवळीकर यांनी केली.
मी माझ्या माणसांना सोमवारीच म्हादई नदीला भेट देण्यासाठी पाठवले होते. छायाचित्रेही घेण्यास सांगितले होते. म्हादईचे गोव्यात जे पाणी येते, ते पाणी काही ठिकाणी दीड मीटरने कमी झाले आहे. काही ठिकाणी ते पूर्वी दगडांवरून वगैरे खाली येत होते व खळखळ आवाजही होत होता, तो बंद झाला आहे. तर काही ठिकाणी पाणी बरेच आटले आहे असे छायाचित्रंमधून दिसून आले. आपण ही छायाचित्रे जाहीर करत असल्याचे ढवळीकर म्हणाले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याची दखल घ्यावी व गोव्याची जीवनदायिनी वाचविण्यासाठी गंभीरपणो पाऊले उचलावीत. पंतप्रधानांकडे जर त्यांनी गोव्याहून सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीत नेले तर आम्हीच पंतप्रधानांना विषयाचे गांभीर्य पटवून देऊ. तसेच हुबळी धारवाडच्या लोकांसाठी कर्नाटकमधीलच सुपा धरणातून पिण्याच्या पाण्याची सोय करता येईल हेही आम्ही पंतप्रधानांना सांगू. जावडेकर यांच्याकडे तरी मुख्यमंत्र्यांनी जावे व म्हादईच्या खो:यात कर्नाटकने जे बेकायदा काम केले आहे, ते दाखविण्यासाठी संयुक्त पाहणी करून घ्यावी, असे ढवळीकर यांनी सूचविले.
पर्रीकरांनीही अंधारात ठेवले
2014 साली लवादाने अंतरिम आदेश देऊन कर्नाटकने म्हादई नदीचे पाणी वळविण्याबाबत काम करू नये असे बजाविले होते. मात्र त्यानंतरही गेल्या पाच वर्षात कर्नाटकने बरेच काम केले व पाणीही काही प्रमाणात वळविले. खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही हे मान्य केले आहे. सभापतीपदी असतानाही त्यांनी भेट देऊन कर्नाटकने केवढे काम केले ते गोमंतकीयांना सांगितले होते. मग आता पुन्हा लवादाचा अंतरिम आदेश कायम असण्याने गोव्याला काय बरे फायदा होईल ते मुख्यमंत्र्यांनी सांगावे. आम्ही मंत्रिमंडळात असताना मंत्रिमंडळ बैठकीत म्हादईप्रश्नी कधीच तपशीलाने किंवा गंभीरपणो चर्चा झाली नाही. फक्त वकिल म्हादईचा खटला लढवत आहेत, असे सांगितले जात होते. कर्नाटकच्या कारवाया व म्हादई नदीचे पाणी वळविण्याच्यादृष्टीने कर्नाटकने केलेले काम याविषयी स्व. मनोहर र्पीकर यांनी देखील मंत्रिमंडळाला अंधारातच ठेवले होते. काहीजणांनी म्हादईप्रश्नी मध्येच जी पत्रे दिली, त्यामुळेही नुकसान झाले, असे ढवळीकर म्हणाले.