बेकायदा मासेमारीप्रकरणी गोव्याच्या आमदाराला मालवण तहसीलदारांची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 19:19 IST2019-12-17T19:17:24+5:302019-12-17T19:19:07+5:30
एलईडी दिव्यांचा वापर करून मासेमारी करण्यास बंदी असतानाही सिल्वेरा यांच्या मालकीच्या ट्रॉलरने बंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप

बेकायदा मासेमारीप्रकरणी गोव्याच्या आमदाराला मालवण तहसीलदारांची नोटीस
पणजी - सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांना बेकायदा एलईडी मासेमारी प्रकरणात मालवणच्या तहसीलदारांनी नोटिस बजावली असून आज बुधवारी सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. सिल्वेरा यांचा ट्रॉलर चार दिवसांपूर्वी मालवण समुद्रात एलईडी दिवे वापरुन बेकायदेशीररित्या मासेमारी करताना पकडण्यात आला होता.
एलईडी दिव्यांचा वापर करुन मासेमारी करण्यास बंदी आहे. असे असतानाही सिल्वेरा यांच्या मालकीच्या या ट्रॉलरने बंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. १९८१ च्या महाराष्ट्र सागरी मच्छिमारी कायद्यानुसार तहसीलदारांनी ही नोटीस त्यांना बजावली असून ते उपस्थित न राहिल्यास अनुपस्थितीत प्रकरण निकालात काढले जाणार असल्याचे म्हटले आहे.
मालवणच्या गस्ती नौकेवरील मच्छिमारी अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी मालवणमध्ये पकडला होता. ट्रॉलरवर सुमारे ६0 हजार रुपये किमतीची मासळी होती. मच्छिमारी अधिकाऱ्यांनी नंतर हे प्रकरण महसूल खात्याकडे पाठवले. आमदार सिल्वेरा यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी फोन केला असता संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, गोव्यात पारंपरिक मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या ‘गोंयच्या रांपणकारांचो एकवोट’ या संघटनेचे अध्यक्ष आग्नेल रॉड्रिग्स यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, ‘ आमदार सिल्वेरा यांचा ट्रॉलर पकडला गेला ही सरकारसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. गोव्यात एलईडी मच्छिमारीबंदी अंमलात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे.’