Maharashtra Bandh : महाराष्ट्रातील विविध भागात जाणार्या कदंब महामंडळाच्या 36 बस फेऱ्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 15:08 IST2018-08-09T15:07:21+5:302018-08-09T15:08:42+5:30
Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंदमुळे गोव्यातून मिरज, कोल्हापूर सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण तसेच अन्य ठिकाणी जाणाऱ्या कदंब बसगाड्यांच्या 36 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत.

Maharashtra Bandh : महाराष्ट्रातील विविध भागात जाणार्या कदंब महामंडळाच्या 36 बस फेऱ्या रद्द
पणजी : महाराष्ट्र बंदमुळे गोव्यातून मिरज, कोल्हापूर सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण तसेच अन्य ठिकाणी जाणाऱ्या कदंब बसगाड्यांच्या 36 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. गाड्या पत्रादेवी दोडामार्ग सातार्डा हद्दीपर्यंतच जात आहेत. कदंब नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात जाणाऱ्या कदंबच्या काही बसगाड्या सकाळी गेल्या परंतु हद्दीपर्यंतच प्रवाशांची सोय करण्यात आली. महाराष्ट्रातून गोव्यात येणाऱ्या एसटी बस गाड्याही येऊ शकलेल्या नाहीत.
सकाळी पुणे मिरज कोल्हापूर मालवण वेंगुर्ले सावंतवाडी या ठिकाणी जाण्यासाठी कदंबच्या बसगाड्या निघतात. महाराष्ट्र बंदमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा गाड्यांचे नुकसान होऊ नये यासाठी या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
(Maharashtra Bandh Live Updates: पुण्यात आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड)
मराठा आरक्षणासाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात मुंबई, ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा आंदोलनात याआधी झालेल्या गाड्यांच्या जाळपोळीची दखल घेऊन कदंबच्या बसगाड्यांना हानी पोहोचू नये यासाठी वरील निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात हा बंद कडकडीत पाळला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून हद्दीपर्यंत गाड्या जात आहेत. सायंकाळी परिस्थिती निवडल्यास पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या निघतील असे सांगण्यात आले. खासगी ट्रॅव्हल्स गाड्या मात्र नेहमीप्रमाणे चालू आहेत आणि कोल्हापूरकडे तसेच अन्य भागातही खासगी बसगाड्या रवाना झालेल्या आहेत.