लुथरा बंधूंची कसून चौकशी; अन्य संशयितांच्या जामिनावर आज सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 11:48 IST2025-12-20T11:47:49+5:302025-12-20T11:48:22+5:30
हणजूण पोलिसांच्या ताब्यात असलेले क्लबचे मालक गौरव आणि सौरव लुथरा बंधूंची सतत दोन दिवस चार ते पाच तास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कसून चौकशी केली जाते.

लुथरा बंधूंची कसून चौकशी; अन्य संशयितांच्या जामिनावर आज सुनावणी
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्नीतांडव प्रकरणात दिल्लीतून अटक करण्यात आलेले तसेच हणजूण पोलिसांच्या ताब्यात असलेले क्लबचे मालक गौरव आणि सौरव लुथरा बंधूंची सतत दोन दिवस चार ते पाच तास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कसून चौकशी केली जाते. दरम्यान या प्रकरणातील संशयित लुथरा बंधूचा भागीदार अजय गुप्ता आणि भारती सिंग यांनी केलेल्या जामीन अर्जावर आज २० रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
आग दुर्घटनेतील प्रमुख संशयित तसेच विदेशात फरार झालेल्या लुथरा बंधूना बुधवारी सकाळी गोव्यात आणण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांचा पोलिस रिमांड दिला होता. रिमांड दरम्यान कोठडीत सुविधा पुरवण्याची करण्यात आलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यामुळे त्याच अवस्थेत कारागृहात पहिले दोन दिवस काढले. घटनेच्या दिवशी या क्लबमध्ये गेलेल्या दिल्लीतील जोशी कुटुंबियांतील चौघांचा मृत्यू झाला होता. या कुटुंबियांच्या वतिने तिघांच्या जामीन अर्जाला हरकत घेणारा अर्ज न्यायालयात दाखल करून जामिनाला विरोध करण्यात आला होता. जोशी यांच्या वतिने अॅड. विष्णू जोशी यांनी न्यायालयात बाजू मांडली होती.
गुप्ताला कोठडीत गादी
अजय गुप्ता याच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ केली होती. अजयने आरोग्याची समस्या नमुद केल्यानंतर त्याला तपासणीसाठी दोन दिवसांपूर्वी जीएमसीत नेण्यात आले होते. त्यानंतर रिमांडमध्ये वाढ करण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांनी केलेल्या मागणीनुसार गुप्ताला कोठडीत गादी पुखण्यात आली आहे.
इतरांचा निर्णय २२ पर्यंत राखून
या प्रकरणातील इतर संशयित विवेक सिंग, प्रियांसू ठाकूर, राजवीर सिंघानिया यांनी केलेल्या जामीन अर्जावर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात गुरुवारी दिवसभर सुनावणी सुरू होती. त्यावर सुरू असलेला युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने यावरील निर्णय २२ डिसेंबरपर्यंत राखून ठेवला आहे.