लुथरा बंधू गोव्याच्या तुरुंगात; ५ दिवसांची कोठडी, चौकशी सुरू झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:56 IST2025-12-18T11:55:49+5:302025-12-18T11:56:47+5:30
प्रकृती बिघडल्याने दोनदा आरोग्य तपासणी

लुथरा बंधू गोव्याच्या तुरुंगात; ५ दिवसांची कोठडी, चौकशी सुरू झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : हडफडेतील बर्च बाय रोमियो लेन या नाइट क्लबमधील आगीच्या दुर्घटनेतील प्रमुख संशयित, फरार क्लबमालक गौरव व सौरभ लुथरा यांना काल बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दिल्लीहून गोव्यात आणण्यात आले. त्याच्या अटकेनंतर या प्रकरणाच्या चौकशीला गती आली आहे. या चौकशीमुळे त्यांना सहकार्य करणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
गोवापोलिसांचे विशेष पथक विमानाने बुधवारी सकाळी दोघांनाही घेऊन मोपा विमानतळावर दाखल झाले. तेथून पथक संशयितांना घेऊन थेट हणजूण पोलिस स्थानकावर आले. त्यानंतर दोघांना शिवोली येथील आरोग्य केंद्रावर वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. तेथे सुविधा उपलब्ध नसल्याने आणि गौरव लुथरा याने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर तपासणीसाठी म्हापशातील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
रुग्णालयातून दोघांना थेट चौकशीसाठी पुन्हा हणजूण पोलिस स्थानकावर नेले. तेथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिस पथकाने त्यांची केली. चौकशीनंतर म्हापसा येथील प्रथम वर्ग न्यायालयात त्यांना नेण्यात आले. यावेळी गौरव याने पुन्हा तब्येत बिघडल्याची तक्रार केल्याने त्याला तपासणीसाठी पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणले. त्यानंतर तेथून पुन्हा न्यायालयात नेण्यात आले.
दरम्यान, लुथरा बंधूंचा सहयोगी भागीदार अजय गुप्ता याच्या वकिलांनी हणजूण पोलिस ठाण्यावर हजेरी लावली होती. तसेच ते नंतर न्यायालयातही उपस्थित होते. बर्च नाइट क्लब दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते.
त्यानंतर सौरभ आणि गौरव हे लुथरा बंधू दिल्लीहून विमानमार्गे फुकेट -थायलंडमध्ये पळून गेले होते. भारतीय सुरक्षा यंत्रणेच्या विनंतीवरून थायलंड पोलिसांनी त्यांना एका हॉटेलमधून ताब्यात घेऊन भारतीय तपास यंत्रणेकडे सुपूर्द केले. मंगळवारी त्यांना थायलंडहून दिल्लीत आणण्यात आले.
सोमवारी त्यांना ताब्यात घेण्यासाठी दिल्लीत गेलेल्या गोवा पोलिसांच्या विशेष पथकाने इंदिरा गांधी विमानतळावरून दोघांना ताब्यात घेतले. दिल्लीत वैद्यकीय चाचणीनंतर संशयितांना पतियाला न्यायालयात संशयितांना हजर केल्यानंतर दोघांनाही ४८ तासांचा ट्रान्सिट रिमांड दिला होता. त्यामुळे दोघांना मुदतीत गोव्यात आणणे शक्य झाले.
क्लबमध्ये नेणार?
सौरभ आणि गौरव लुथरा बंधूची चौकशी पोलिसांकडून सुरू होईल. यांदरम्यान, त्यांना हडफडे बागा येथील बर्च नाइट क्लबमध्ये नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी प्रकरणाचा आढावा घेतला जाईल.
पाच दिवसांची कोठडी
लुथरा बंधूंना म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी न्यायालयाकडे १० दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने दोघांनाही ५ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
कडक पोलिस बंदोबस्त
मोपा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता. विमानतळाबाहेर, तसेच आत पोलिस पथक वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत उपस्थित होते. बंदोबस्तात दोघांना विमानतळाबाहेर आणण्यात आले. हणजूण पोलिस ठाण्यात नेईपर्यंत कडक बंदोबस्त होता. पोलिस ठाण्यातही इतरांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. दोन्ही गेट बंद करून पोलिस तैनात केले होते. बॅरिकेड लावून रस्तेही अडविण्यात आले होते.
कपडे, चष्मा, चप्पल वापरण्यास परवानगी
दिल्लीत ट्रान्सिट रिमांड देताना न्यायालयाने सौरभ आणि गौरव लुथरा यांची १२ तासांत पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश आदेश दिले होते. न्यायालयाने त्यांना कुटुंबीयांकडून कपडे, चष्मा आणि चप्पल घेण्याची परवानगी दिली होती. आरोपींना आवश्यक असलेली औषधे प्रवासादरम्यान उपलब्ध करून देण्याची, तसेच गरज भासल्यास आपल्या वकिलांना भेटून कायदेशीर सल्ला घेण्याची सोय करण्याचे निर्देश दिले होते.
पत्रकारांच्या प्रश्नांवर दोघांचेही मौन
मोपा विमानतळ तसेच हणजूण पोलिस स्थानक, म्हापशात जिल्हा रुग्णालय आणि न्यायालय अशा विविध ठिकाणी पत्रकारांनी लुथरा बधुंना गाठण्याचा प्रयत्न केला. प्रतिनिधींनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली, पण एकाही प्रश्नाला उत्तर न देता गौरव व सौरभ यांनी शांत राहण्यावर भर दिला.
तासभर उपचार
गौरव आणि सौरभ यांनी तब्येत बिघडल्याची तक्रार केली होत. एकाने पाठदुखीची, तर दुसऱ्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात त्यांची दोनदा वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी सुमारे तासभर उपचार केल्यानंतर दोघांनाही कडक बंदोबस्तात हणजूण पोलिस स्थानकावर नेण्यात आले.
या परिसरातील काही क्लबनी दिलेल्या मंजुरीपेक्षा अधिक बांधकामे करून अतिक्रमणे केली आहेत. काही क्लबनी बेकायदेशीरपणे क्षमता वाढवली आहे. अशांची तपासणी होणे गरजेचे आहे. कळंगुटच्या पोलिस निरीक्षकांनी क्लब तपासणी करण्याची, त्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना, आराखडे तपासण्याची सूचना केली. प्रदूषण मंडळाने असे क्लब तपासणी करुन सील करण्याची गरज आहे. या क्लब्सची मान्यता काढून घ्यावी. - मायकल लोबो, आमदार.