लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : गोव्यातील ग्रामीण भागात शेती संकटात असताना 'विश्वस्त कृषी सहकारी संस्था'ने उल्लेखनीय पुढाकार घेत तब्बल २१ वर्षे पडीक पडलेली जमीन पुन्हा लागवडीखाली आणली आहे. या उपक्रमामुळे ओसाड पडलेली जमीन आज हिरवीगार बनली असून, शेतीक्षेत्रात नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
युवा पिढीच्या पुढाकारातून उभारलेल्या या संस्थेने 'शेती म्हणजे मागासलेपण' या समजुतीला छेद देत शेती हा स्वाभिमान, रोजगार आणि शाश्वत भविष्याचा मार्ग असल्याचा सकारात्मक संदेश समाजात रुजवला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, स्थानिक अनुभव आणि सामूहिक श्रम यांच्या जोरावर पडीक जमिनीला नवसंजीवनी मिळाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष दिनेश गावडे म्हणाले, '२१ वर्षे पडून असलेली जमीन पुन्हा कसणे म्हणजे केवळ उत्पादन नव्हे, तर गावाचा आत्मसन्मान उभा करणे आहे.' तर सचिव गौरेश गावडे यांनी युवकांना आवाहन करताना सांगितले की, 'योग्य दृष्टिकोन, एकजूट आणि मेहनतीच्या जोरावर शेतीतही क्रांती घडवता येते.'
उपक्रमाची वैशिष्ट्ये
२१ वर्षे पडीक पडलेली जमीन पुन्हा शेतीयोग्य करण्यात आली. बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाण्याचे नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला नवजीवन देण्यात आले. सामूहिक श्रम आणि युवकांच्या सहभागामुळे प्रकल्प यशस्वी ठरला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळाल्या असून, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. स्वावलंबन, पर्यावरण संवर्धन आणि सामूहिक विकास या तिन्ही बाबी साध्य करत हा प्रकल्प इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
२१ वर्षे पडीक पडलेली जमीन पुन्हा कसणे हे केवळ उत्पादन वाढवण्यापुरते मर्यादित नाही, तर तो गावाच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. आम्ही शेतीकडे केवळ उपजीविकेचा मार्ग म्हणून नाही, तर स्वाभिमान आणि शाश्वत भविष्य म्हणून पाहतो. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक अनुभव यांची सांगड घातल्यास शेतीत मोठे परिवर्तन घडवता येते, यावर आमचा विश्वास आहे. युवकांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून पुढाकार घेतला, तर ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. - दिनेश गावडे, अध्यक्ष, विश्वस्त कृषी सहकारी संस्था
Web Summary : Goa's Vishwasta Krishi Cooperative revitalized 21 years of barren land, inspiring rural areas. Youth embraced agriculture with modern techniques, creating jobs and promoting self-reliance. The initiative showcases farming as sustainable and dignified, encouraging others to transform rural economies.
Web Summary : गोवा की विश्वस्त कृषि सहकारी संस्था ने 21 साल की बंजर भूमि को पुनर्जीवित किया, जिससे ग्रामीण क्षेत्रों को प्रेरणा मिली। युवाओं ने आधुनिक तकनीकों के साथ कृषि को अपनाया, रोजगार सृजित किया और आत्मनिर्भरता को बढ़ावा दिया। यह पहल कृषि को टिकाऊ और गरिमापूर्ण दिखाती है, और दूसरों को ग्रामीण अर्थव्यवस्थाओं को बदलने के लिए प्रोत्साहित करती है।