लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 10:26 IST2025-05-03T10:24:41+5:302025-05-03T10:26:24+5:30

शिरगाव येथील हृदयद्रावक दुर्घटना : पन्नासहून अधिक भाविक जखमी, गंभीर १५ जणांवर उपचार सुरू असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली; तसेच जखमींची विचारपूस केली.

Lairai Devi stampede: Aunt and nephew lost their lives during the pilgrimage, names of the deceased revealed | लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर

लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर

- प्रवीण पाटील, डिचोली 
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील प्रसिद्ध देवी लईराईच्या जत्रोत्सवात आज, शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. यात सहा भाविकांचा मृत्यू झाला असून पन्नासहून अधिक जखमी झाले आहेत. तर यातील १५ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा आढावा घेतला. तसेच डिचोली, गोमेकॉ इस्पितळात जाऊन मृतांच्या नातेवाईकांची व जखमींची भेट घेतली.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षीपेक्षा यंदा लईराईच्या जत्रेत मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. पहाटे तीनच्या सुमारास अग्निदिव्य सुरू असताना अचानक चेंगराचेंगरी सुरू झाली. यावेळी गर्दीत अनेकजण खाली पडले. यात श्वास कोंडल्याने सहा जणांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक जखमी झाले. 

घटना घडली त्यावेळी पोलिसही मोठ्या संख्येने हजर होते. मात्र, गर्दी आटोक्यात आणणे शक्य झाले नाही.

या घटनेची माहिती मिळतात मुख्यमंत्री डॉ. प्रमुख सावंत तातडीने डिचोली आरोग्य केंद्रात दाखल झाले. या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या जखमींची त्यांनी विचारपूस केली. तसेच प्रशासकीय यंत्रणेला तातडीने आवश्यक ते मदत कार्य करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गोमेकॉ इस्पितळात जाऊन जखमींची भेट घेतली. 

वाचा >>'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल

यावेळी मामलेदार अभिजित गावकर, उपजिल्हाधिकारी भीमनाथ खोरजुवेकर, श्रीपाद माजिक हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. डिचोली आरोग्य केंद्राच्या डॉ. सिद्धी कासार व त्यांच्या टीमने तातडीने जखमींवर उपचार सुरू केले.

घटनेतील मृतांची नावे

जत्रेतील चेंगराचेंगरीत मृतांमध्ये सूर्या मयेकर (साखळी), आदित्य कवठणकर व तनुजा कवठणकर (दोघेही अवचीतवाडो-थिवी), यशवंत केरकर (माडेल-थिवी), प्रतिभा कळंगुटकर (कुंभारजुवे) व सागर नंदरगे (माठवाडा-पिळगाव), अशी मृतांची नावे आहेत. या घटनेतील मृत आदित्य व तनुजा हे काकू व पुतण्या असून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

म्हापशात ३० हून अधिक जखमी भाविकांवर उपचार

लईराईच्या जत्रेतील चेंगराचेंगरीतील जखमी भाविकांना आज, पहाटे ४ वाजल्यापासून म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत ३० हून अधिक भाविकांना दाखल करण्यात आले असून यातील चौघाजणांचा मृत्यू झाला आहे. 

घटनेची माहिती मिळताच मंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीत्ते यांच्यासह पोलिसांनी उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात धाव घेतली. इस्पितळात जखमींचे कुटुंबीय, नातेवाईक व मित्र मंडळी उपस्थित होते.  

भाविकांना विजेचा शॉक

लईराईच्या जत्रेत स्टॉल उभारण्यात आले आहेत. चेंगराचेंगरीवेळी यातील काही स्टॉलवर भाविक पडले. त्याचवेळी स्टॉलना पुरवण्यात आलेल्या वीज केबल्सना भाविकांचा स्पर्श होऊन अनेकांना शॉक बसल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त;  सर्व शासकीय कार्यक्रम तीन दिवस रद्द

शिरगाव येथील घटना अत्यंत दुर्दैवी असून उत्तर गोवा जिल्हाधिकारी व पोलिस यंत्रणेला आपण चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन  त्यांचे सांत्वन केले. तसेच जखमींची विचारपूस केली. यावेळी पुढील तीन दिवसांसाठी सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत .

शिरगावावर दु:खाचा डोंगर

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या देवी लईराईच्या जत्रेतील चेंगराचेंगरीमुळे शिरगाव गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेनंतर भाविकांच्या धावपळ सुरू झाली. नेमकी घटना कशामुळे घडली याचा तपास डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी व त्यांचे पथक करत आहे.

Web Title: Lairai Devi stampede: Aunt and nephew lost their lives during the pilgrimage, names of the deceased revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.