नोकरीकांड: पूजा व कुटुंबाचे ८.६ कोटींचे व्यवहार उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 11:14 IST2025-12-03T11:13:02+5:302025-12-03T11:14:06+5:30
उमेदवारांची दिशाभूल करून उकळले कोट्यवधी रुपये; विदेश दौरेही केले

नोकरीकांड: पूजा व कुटुंबाचे ८.६ कोटींचे व्यवहार उघड
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :नोकरीकांड प्रकरणातील मुख्य संशयित पूजा नाईक हिने वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांविरोधात केलेल्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. पूजा ही मगो पक्षाच्या कार्यालयात देखील कामाला नव्हती, असेही तपासात समोर आले आहे. उलट पूजा व कुटुंबीयांच्या खात्यातून ८.६ कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आहे, असे गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले.
पूजा ही मगोच्या कार्यालयात कामाला असल्याचा कुठलाही पुरावा नाही. उलट पूजा हिने लोकांची दिशाभूल करून नोकरी इच्छुक उमेदवारांकडून सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले. त्याच पैशातून ती सुखसोयीचे आयुष्य जगली व विदेश दौरेही केल्याचे तपासात समोर आले आहे.
अधीक्षक गुप्ता म्हणाले, की मगोच्या कार्यालयात काम करत असताना एका मंत्र्याने तिची ओळख सरकारी अधिकाऱ्यांकडे केल्याचा आरोप पूजा हिने केला होता. मात्र, या आरोपात कुठलेही तथ्य नाही. तिने ६१३ उमेदवारांकडून पैसे घेतले असून, या सर्वांची नावे तिने डायरीत लिहिली आहेत. ती डायरी तन्वी नाईक हिच्याकडे आहे. पर्वरी येथील पीडीए कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये पैशांचा हा व्यवहार व्हायचा, असेही तिने सांगितले होते. मात्र, तेदेखील खोटे असल्याचे उघड झाल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
'तो' मोबाईल ताब्यात
आपल्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ असून, त्याचे पुरावे असल्याचे पूजा हिने सांगितले होते. त्यानुसार हा मोबाईल पोलिसांनी ट्रॅक केला व तो उत्तर प्रदेश येथे असल्याचे आढळून आले. पूजाचा नवरा पुरुषोत्तम यांनी हा फोन २७ हजार रुपयांना विकल्याचे समोर आले असून, ज्याला तो विकला होता, त्याच्याकडून हा फोन पोलिसांनी मिळवला असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.
कायदेशीर सल्ला
पूजा हिने सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून ज्या उमेदवारांकडून पैसे घेतले होते, त्यांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी काय केले जाऊ शकते, यासाठी कायदेशीर सल्ला घेतला जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
पूजा नाईकचे बँक व्यवहार
२०१९ ते २०२४ या काळात ३.५४ कोटींचे बँक व्यवहार. पूजाचे पती पुरुषोत्तम यांच्या बँक खात्यात २०१९ ते २४ काळात ४.३९ कोटींचे व्यवहार. पूजाच्या दोन मुलींच्या खात्यात १३.१८ लाख रुपये आढळले. सर्वांच्या खात्यात मिळून ८.०६ कोर्टीचे व्यवहार
तीन कोटींची वाहनेच...
बीएमडब्ल्यू, फॉर्च्यूनर, ऑडी, इमजी, हुंडाय, होंडा सारख्या सहा महागड्या कार. तीन अर्थमुव्हर्स. मोटारसायकल व स्कूटर. वाहनांची किंमत ३ कोटींहून अधिक