भाजपमध्ये खरेच खतखते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 07:58 IST2025-03-25T07:58:08+5:302025-03-25T07:58:41+5:30

मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यानंतरच्या काळापासून विविध राजकारण्यांना पर्रीकरांविषयी जास्तच प्रेम वाटू लागले आहे.

is there really a problem and unrest in the bjp | भाजपमध्ये खरेच खतखते?

भाजपमध्ये खरेच खतखते?

मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यानंतरच्या काळापासून विविध राजकारण्यांना पर्रीकरांविषयी जास्तच प्रेम वाटू लागले आहे. पर्रीकर हयात होते, राज्य कारभार चालवत होते त्यावेळी काही राजकारणी काय बोलत होते व नंतर काय बोलू लागलेत, याची असंख्य उदाहरणे जनतेसमोर आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी रमेश तवडकर यांना काणकोणमध्ये भाजपने तिकीट नाकारले होते. अर्थात त्यावेळी तिकीटवाटपाचे सर्वाधिकार त्या वेळचे केंद्रीय मंत्री पर्रीकर यांनाच होते. लक्ष्मीकांत पार्सेकर त्यावेळी मुख्यमंत्रिपदी होते, तरी त्यावेळी तिकीटवाटप कसे व्हायचे हे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व त्यावेळच्या कोअर टीमलाही ठाऊक असेल. तिकीट नाकारल्याने तवडकर भाजप सोडून अपक्ष लढले होते. साहजिकच त्यांच्या वाट्याला पराभव आला. तिकीट नाकारले तरी, भाजपमध्येच राहीन आणि पक्षाची सेवा करीन, असा उदात्त किंवा राष्ट्रप्रेमाचा विचार तेव्हा तवडकर यांनी केला नव्हता, हा भाग वेगळा.

तवडकर २०२२ साली निवडून आले. भाजपने तिकीट देऊन स्वतःची चूक सुधारली. मात्र, अलीकडे तवडकर यांच्याकडून जी विधाने केली जात आहेत, त्यातून भाजपमधील शिस्तीला तडे जाणार नाहीत ना, असा प्रश्न निर्माण होतो. अर्थात पक्षात आता पूर्वीसारखी शिस्त राहिलेलीच नाही. माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी मध्यंतरी गोवा सरकारचे वस्त्रहरण केले. त्यानंतर त्यांनी यू-टर्न घेतला हा वेगळा विषय. अलीकडे बाबू आजगावकर व प्रवीण आर्लेकर यांच्यात वाद रंगलाय. मध्यंतरी मंत्री गोविंद गावडे व सभापती तवडकर यांच्यातील युद्ध सर्वांनीच अनुभवले. प्रसंगी सभापतिपद सोडेन, असा इशारा तवडकर यांना द्यावा लागला होता. गेल्या आठवड्यात मायकल लोबो आणि जोशुआ डिसोझा या दोन्ही भाजप आमदारांनी एकमेकांना जाहीरपणे आव्हान दिले. एकंदरीत भाजपमधील शिस्तीच्या सध्या चिंधड्या उडविल्या जात आहेत. नवे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना हे पाहावे लागत आहे. अधूनमधून मंत्री विश्वजित राणे आपले बाण चातुर्याने सोडतात. भाजप-मगो युती कायम राहायलाच हवी, असा मुद्दा ते मांडतात; तर मुख्यमंत्री सावंत युती कशीही करा; पण, मांद्रेची जागा भाजप सोडणार नाही, असे बजावतात.

तवडकर यांनी दोनच दिवसांपूर्वी जाहीर कार्यक्रमात मोठे विधान केले. भाजपमध्ये आता मिक्स भाजी आणि खतखते झालेले आहे, असे तवडकर म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. निष्ठावान कार्यकर्ते आता भाजपमध्ये शोधूनही सापडेनासे झाले आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. श्रमधाम उपक्रमासंबंधीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी एक प्रकारे आक्रमक भूमिका घेतली. भाजपमध्ये विविध ठिकाणांहून नेते, कार्यकर्ते यांची आयात सुरू आहे, हे तवडकर यांना मान्य नसावे; हे त्यांच्या नाराजीवरून कळून येते. तवडकर यांना लवकर एकदा मंत्रिमंडळाची फेररचना झालेली हवी आहे. मंत्री गावडे यांच्याशी त्यांचे पटण्याचा प्रश्नच येत नाही. प्रियोळमध्ये तवडकर अनेकदा जातात, ही गोष्ट गावडे यांनाही खटकते. तवडकर यांची दीपक ढवळीकर तसेच माजी आमदार दयानंद सोपटे यांच्याशी दोस्ती वाढली आहे, हे भाजपच्या कोअर टीमच्याही लक्षात आले आहे. मनोहर पर्रीकर आमच्यातून लवकर जातील, असे कुणालाही वाटले नव्हते. पर्रीकर यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्यामुळे कार्यकर्ते निरपेक्ष भावनेने काम करायचे, असे तवडकर म्हणाले. पर्रीकरांच्या निधनानंतर भाजपमध्ये स्थिती बदलली. आता तर मिक्स भाजी आणि खतखतेच झाले आहे, असे निरीक्षण तवडकर यांनी नोंदविले आहे.

तवडकर यांच्या भूमिकेविषयी भाजपचे नेतृत्व काय तो विचार करील. शेवटी पक्षात नेत्यांची, कार्यकर्त्यांची आयात करण्याचे निर्णय दिल्लीतच होतात. भाजपने सर्व राज्यांत गेल्या १० वर्षांत तेच केले आहे. मग, गोव्यातच मिक्स भाजी व खतखते झाले, असे कसे म्हणता येईल? पक्षाची वाढ अशाच प्रकारे झालेली आहे. काहीवेळा असे करताना निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, ही गोष्ट खरी. तवडकर खोटे बोलले, असे मुळीच नाही. त्यांनी सत्यच अधोरेखित केले; पण, ते आता सांगण्याची वेळ का आली, हा प्रश्न येतोच. मध्यंतरी त्यांनी मंत्रिमंडळ फेररचना १५ दिवसांत होईल, अशा अर्थाचे विधानही केले होते. मात्र, अजून तरी फेररचना झालेली नाही.

Web Title: is there really a problem and unrest in the bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.