अमित शहांच्या दरबारी दिगंबर कामतांचे महत्त्व; गोव्यातील राजकीय स्थितीची घेतली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 14:34 IST2026-03-26T14:34:12+5:302026-03-26T14:34:44+5:30

दिल्लीत झाली भेट

importance of digambar kamat at amit shah place information about the political situation in Goa | अमित शहांच्या दरबारी दिगंबर कामतांचे महत्त्व; गोव्यातील राजकीय स्थितीची घेतली माहिती

अमित शहांच्या दरबारी दिगंबर कामतांचे महत्त्व; गोव्यातील राजकीय स्थितीची घेतली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यात राजकीयदृष्ट्या स्थिती कशी आहे, सध्या कोणते विषय गोव्यातील लोकांमध्ये चर्चेत आहेत, आंदोलनांचे विषय काय आहेत, भाजपचे स्थान कसे आहे व अन्य अनेक विषयांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्री दिगंबर कामत यांच्याकडून परवा माहिती जाणून घेतल्याचे राजकीय सूत्रांनी लोकमतला सांगितले. मंत्री कामत व अमित शहा यांची मंगळवारी सायंकाळी दिल्लीत बैठक झाली.

कामत यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद मिळाल्यानंतर कामत हे सहकुटुंब परवा अमित शहा यांना भेटले. पूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहकुटूंब भेटून आले होतेच. कौटुंबिक स्वरुपाची चर्चा अमित शहा यांच्यासोबत झाल्यानंतर मग शहा व कामत यांच्यात पाच ते सात मिनिटे वन टू वन अशी चर्चा झाली. शहा व कामत हे दोन्ही नेते एकमेकांशी गोव्यातील राजकीय विषयांवर बोलले. तामिळनाडूची वगैरे निवडणूक पार पडल्यानंतर मग गोवा विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी चर्चा केली जाणार आहे. त्यावेळीही गृहमंत्री शहा हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह दिगंबर कामत व इतरांशी बोलतील, असे राजकीय सूत्रांनी सांगितले.

सध्या गोव्यात कोणते विषय तापलेले आहेत, जनतेचे मत सरकारविषयी काय आहे, भाजपचे काम गोव्यात कसे चाललेय व अन्य अनेक विषयांबाबत शहा यांनी माहिती जाणून घेतली.

गोव्यावर अमित शहा यांचे पूर्वीपासून लक्ष आहेच. गोव्यातील स्थितीबाबत त्यांना अन्य माध्यमांतूनही माहिती मिळतच असते, असे राजकीय सूत्रांनी स्पष्ट केले. दिगंबर कामत यांनी सहकुटुंब भेटण्यासाठी पूर्वी वेळ मागितली होती. त्यांना शहा यांनी वेळ दिली व गोव्याविषयी जास्त तपशीलाने जाणून घेतले.

लवकरच ठरणार रणनीती

दरम्यान, कामत यांचा परिचय भाजपच्या अनेक केंद्रीय नेत्यांशी पूर्वीपासून आहे. कामत यांचा मान केंद्रीय भाजप नेत्यांकडून राखला जातो. कामत हे पूर्वीही भाजपमध्ये होते. शिवाय ते वयाने ज्येष्ठ असल्याने त्यांना केंद्रीय नेत्यांकडून महत्त्व दिले जाते. 

गोव्यातील काही मंत्री व आमदारांना याची कल्पना आलेली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीची रणनीती पुढील काही दिवसांत ठरणार आहे. त्यावेळी शहा हे कदाचित मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत पुन्हा कामत यांना दिल्लीला बोलावू शकतात.

मंत्रिमंडळातील जागा भरणार

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पर्वरीत काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधींनी मंत्रिमंडळातील एका रिक्त जागेविषयी विचारले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी फोंडा पोटनिवडणुकीनंतर मंत्रिमंडळातील जागा भरली जाईल असे विधान केले. यामुळे पुन्हा एकदा काही आमदारांच्या इच्छा जाग्या झालेल्या आहेत.
 

Web Title : अमित शाह ने कामत के माध्यम से गोवा की राजनीति का आकलन किया; रणनीति जल्द

Web Summary : अमित शाह ने दिगंबर कामत के साथ गोवा के राजनीतिक परिदृश्य पर चर्चा की, जिसमें प्रमुख मुद्दों और भाजपा की स्थिति पर जानकारी एकत्र की गई। तमिलनाडु चुनावों के बाद, गोवा की चुनावी रणनीति तैयार की जाएगी, जिसमें कामत और मुख्यमंत्री सावंत शामिल हो सकते हैं। आगामी उपचुनाव के बाद एक खाली कैबिनेट पद भरा जाएगा।

Web Title : Amit Shah Gauges Goa Politics via Kamat; Strategy Soon

Web Summary : Amit Shah discussed Goa's political landscape with Digambar Kamat, gathering insights on key issues and BJP's standing. Post-Tamil Nadu elections, Goa's election strategy will be formulated, potentially involving Kamat and Chief Minister Sawant. A vacant cabinet position will be filled after the upcoming by-election.