काँग्रेस सत्तेवर आल्यास मांडवी नदीतून कॅसिनो हटवू: युरी आलेमाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 09:22 IST2026-01-29T09:21:28+5:302026-01-29T09:22:53+5:30
पणजी मनपासाठी उत्पल यांना पाठिंबा शक्य

काँग्रेस सत्तेवर आल्यास मांडवी नदीतून कॅसिनो हटवू: युरी आलेमाव
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात सर्व विरोधकांनी एकत्र यावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. प्रसंगी उत्पल पर्रीकर यांच्या पॅनलला पाठिंबा शक्य असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले. २०२७मध्ये राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यास मांडवीतील कॅसिनो हटवणार', असे त्यांनी जाहीर केले.
बुधवारी पत्रकार परिषदेत युरी आलेमाव म्हणाले की, 'नुकतेच दिल्ली भेटीत पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी झालेल्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने तयारीबाबत चर्चा झाली. भ्रष्टाचाराविरोधात तसेच लोकांच्या अन्य प्रश्नांवर रस्त्यावर उतरण्याच्या सूचना श्रेष्ठींनी केल्या.'
विरोधक एकत्र यावेत...
युरी आलेमाव म्हणाले की, 'आता महापालिका, इतर नगरपालिकांच्या निवडणुका होतील. या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नसल्या तरी भाजपविरोधात विरोधकांनी एकत्र येऊन त्या लढावाव्यात ही काँग्रेसची भूमिका आहे.'
पणजी महापालिकेबाबत लवकरच निर्णय
पणजी महापालिका निवडणुकीत उत्पल पर्रीकर हे पॅनल उभे करणार आहेत, त्याबद्दल विचारले असता युरी म्हणाले की, 'या विषयावर आमची चर्चा चालू आहे. पणजीच्या हिताच्या दृष्टिकोनातून काँग्रेस निर्णय घेणार आहे.
एकत्रितपणे पुढे जाण्याबाबत किंवा उत्पल यांच्या पॅनलला पाठिंबा देण्याबाबत काय तो निर्णय होईल. राजधानी शहरात कॅसिनो, स्मार्ट सिटीच्या कामांमधील भ्रष्टाचार, कचरा विल्हेवाटीचा प्रश्न, असे अनेक प्रश्न आहेत. महापालिकेतील भाजपची सत्ता दूर करण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावेच लागेल.'
विधानसभेसाठीही सर्वजण एकत्र येऊ
युरी आलेमाव म्हणाले की, 'आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊनच भाजपशी लढा द्यावा, अशी लोकभावना आहे. लोक गोव्यासाठी जे चांगले आहे ते निवडतील.' ते म्हणाले की, 'राज्यात घाऊक भूरुपांतरणे, जमीन घोटाळे, भ्रष्टाचार लूट, हफ्ता वसुली चालूच आहे.
गुन्हेगारांपासून गोव्याचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकजण लढत आहे. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सर्व विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणणे हे काँग्रेसचे कर्तव्य आहे आणि आम्ही त्यादृष्टीने पावले टाकत आहोत.
काँग्रेस नेहमीच जनतेसोबत
युरी म्हणाले की, 'नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात विरोधी आमदारांनी भाजप सरकारला कसे उघडे पाडले हे लोकांनी पाहिले. त्याचा चांगला परिणाम झाला. मला विश्वास आहे की २०२७ मध्ये काँग्रेस सत्तेत येईल. त्यानंतर, आम्ही लोकांना त्यांना काय हवे आहे आणि काय नको आहे हे निवडण्याची संधी देऊ. काँग्रेस नेहमीच जनतेसोबत राहिली आहे आणि त्यांनी विरोध केलेले प्रकल्प रद्द केले आहेत.
दिल्ली भेटीबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले की, 'राहुल गांधी यांनी गोव्याच्या समस्या सोडवण्यात खूप रस घेतला आहे. विविध मुद्याबाबत त्यांना आम्ही माहिती दिली."