बर्चप्रकरणी दोषींना फाशी द्या; मृतांच्या कुटुंबीयांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:11 IST2026-01-05T13:10:16+5:302026-01-05T13:11:04+5:30
दिल्लीत निदर्शने, जामीनअर्जालाही आक्षेप

बर्चप्रकरणी दोषींना फाशी द्या; मृतांच्या कुटुंबीयांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबमधील अग्निकांडात २५ जणांचा बळी गेला. या संपूर्ण प्रकरणात दोषी असलेल्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी या अग्निकांडातील मृतांच्या कुटुंबीयांनी केली. नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे रविवारी त्यांनी निदर्शने केली.
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या क्लबमध्ये अग्निकांडात मरण आलेल्या जोशी कुटुंबीयांचा, तसेच अन्य मृतांच्या नातेवाईकांचा समावेश होता. या अग्निकांडात दिल्लीतीलच जोशी कुटुंबाच्या चार सदस्यांचा मृत्यू झाला होता. हे लोक गोव्यात पर्यटनासाठी आले होते. या अग्निकांडप्रकरणी बर्च क्लबचे मालक गौरव व सौरभ लुथरा यांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह बर्च क्लबचे सहमालक अजय गुप्ता, क्लबचे चार मॅनेजर हेही अटकेत आहेत. या प्रकरणातील बहुसंख्य संशयितांनी या प्रकरणात जामिनासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
दरम्यान, आंदोलनावेळी जोशी कुटुंबीयांच्या वकिलाने सांगितले की, संशयित क्लबमालक गौरव व सौरभलुथरा यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. इतर संशयितांनी न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. मात्र त्याला आमचा विरोध आहे.
कठोर शिक्षा करा
दरम्यान, राज्य सरकारकडून बर्च अग्निकांडात मरण आलेल्यांना न्याय मिळावा, यासाठी या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयाने जामीन देऊ नये, त्यांना कठोर शिक्षा व्हावी, फाशीची व्हावी, अशी मागणी आम्ही करीत असून, न्यायसंस्थेने त्याची दखल घ्यावी, अशी मागणीही जोशी कुटुंबीयांनी केली. जोशी कुटुंबीयांसह अन्य मृतांचे नातेवाईक यावेळी या आंदोलनात सहभागी झाले होते.
पसार सरपंच, सचिवाचा शोध सुरू
दरम्यान, हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकर व राज्य सरकारने बडतर्फ केलेले सचिव रघुवीर बागकर यांचा पोलिस शोध घेत आहेत. तीन दिवसांनंतरही या दोघांचाही शोध लागू शकलेला नाही. बर्च अग्निकांडानंतर लगेच राज्य सरकारने तत्कालीन सरपंच रेडकर यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. तर सचिव बागकर यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. या दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून पोलिस त्यांच्या शोधात आहेत.
जामीन अर्जाला विरोध
क्लब मालकांनी केलेल्या जामीन ञ्जाला आम्ही विरोध केला आहे. तशी आव्हान याचिका न्यायालयात दाखल केल्याचे जोशी कुटुंबीयांच्या वकिलाने प्रसारमाध्यमांना सांगितले.
न्यायदंडाधिकाऱ्यांचा अहवाल सादर
बर्च क्लबमधील दुर्घटनेनंतर राज्य सरकारने न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. तत्पूर्वी सरकारने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सचिव तसेच पंचायत संचालकांना निलंबित केले होते. त्यानंतरच्या कारवाईत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले. परवाना प्रक्रियेत आपली जबाबदारी पार न पाडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. राज्यातील क्लब व इतर व्यवसायांच्या मंजुरीसाठी धोरण ठरविण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.