कदंबमध्ये महिला प्रवाशांना अर्धे तिकीट: मुख्यमंत्री, खासगी नोकरदार महिलांना लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:49 IST2025-10-03T12:48:22+5:302025-10-03T12:49:22+5:30
येथील बस स्थानकावर कदंब महामंडळाच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सावंत बोलत होते.

कदंबमध्ये महिला प्रवाशांना अर्धे तिकीट: मुख्यमंत्री, खासगी नोकरदार महिलांना लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या महिलांना कदंब बसमध्ये अर्ध्या तिकिटाची सवलत लवकरच सुरू केली जाईल. तसेच, प्रवाशांसाठी 'ट्रांझिट कार्ड' सुरू केले जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.
येथील बस स्थानकावर कदंब महामंडळाच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सावंत बोलत होते. व्यासपीठावर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, महामंडळाचे चेअरमन आमदार उल्हास तुयेंकर, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी पहिल्या कदंब बसची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल कदंब कर्मचाऱ्यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांनी केला.
याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, कदंब कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित थकबाकीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाईल. ५० टक्के थकबाकी याआधीच दिलेली आहे. पुढील तीन महिन्यांत उर्वरित थकबाकीही कर्मचाऱ्यांना मिळेल. 'माझी बस' योजनेद्वारे खासगी बसमालकांना सरकारने आतापर्यंत दोन कोटी रुपये अनुदान दिले. दरमहा अठरा हजार रुपये अनुदान बसमालकांना मिळते, ते २५ हजार रुपयांवर नेले जाईल.
वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले की, 'जानेवारी २०२६ पर्यंत कदंब महामंडळ पूर्णपणे डिजिटलाइज्ड होईल. इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग, मार्गाचे जिओ मॅपिंग, अॅप आधारित व्यवस्था व ई-पेमेंट मार्गी लागेल.'
कदंब महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेंकर म्हणाले की, '२०२७पर्यंत कदंब महामंडळ २७० बस भंगारात काढणार असून, १०० नव्या ईलेक्ट्रिकल बसगाड्या महामंडळाच्या ताफ्यात येतील. पीपीपी तत्त्वावर प्रमुख बसस्थानकांचे नूतनीकरण केले जाईल. साधन सुविधा विकास महामंडळ पर्वरी येथे कदंब महामंडळासाठी मुख्यालयाकरिता सुसज्ज अशी इमारत बांधणार आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
कुटुंबातील कोणीही वापरू शकते कार्ड
महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर यांनी 'लोकमत'ला सांगितले की, 'दोन ते तीन महिन्यांत ट्रांझिट कार्ड वितरण सुरू केले जाईल. सध्या आम्ही प्रवाशांना स्मार्ट कार्ड देतो. विद्यार्थ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना तिकीट सवलतीचे पास दिले जातात. ट्रांझिट कार्डामध्ये 'चिप' असेल. सध्या स्मार्ट कार्डासाठी सुरुवातीला आम्ही १५० रुपये घेतो. परंतु, कार्ड रिचार्ज करून प्रवाशांना या पैशात प्रवास करण्याची मुभा दिली जाते. ट्रांझिट कार्डही तशाच स्वरूपाचे असेल. प्रिपेड कार्डवर १० टक्के सवलत, महिन्याच्या पासवर ४० टक्के, तर विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना ७० टक्के सवलत दिली जाते.
काय आहे ट्रांझिट कार्ड ?
कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार एकाने कार्ड घेतल्यानंतर प्रवासासाठी कुटुंबातील कोणीही व्यक्ती ते वापरू शकते. सुरुवातीला हे कार्ड मोफत दिले जाईल. प्रवासी ते रिचार्ज करून प्रवास करू शकतील. घरातील कोणीही व्यक्ती हे कार्ड वापरू शकेल.'