विद्यार्थ्यांच्या भवितव्याची सरकारला काळजी; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 11:55 IST2026-02-10T11:52:57+5:302026-02-10T11:55:51+5:30
दीनदयाळ मुख्यमंत्री कौशल्य योजना अभ्यासक्रम सुरू, ईगल क्लबच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

विद्यार्थ्यांच्या भवितव्याची सरकारला काळजी; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: राज्यातील उच्च शिक्षित युवकांबरोबरच आठवी उत्तीर्ण, दहावी नापास विद्यार्थ्यांच्या भवितव्याचीही सरकारला तितकीच काळजी आहे. त्यांच्यासाठी तीन महिन्यांचा दीनदयाळ मुख्यमंत्री कौशल्य योजना अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून युवकांनी आपले भविष्य घडवावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
साखळीतील ईगल स्पोर्टस क्लबच्या नवीन कार्यालय व वाचनालयाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, उपनगराध्यक्ष दयानंद बोर्येकर, नगरसेवक आनंद काणेकर, प्रवीण ब्लेगन, नगरसेविका दीपा जल्मी, रियाझ खान तसेच ईगल स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष प्रशांत फातर्फेकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, क्रीडा क्षेत्रात पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देतानाच २०३६च्या ऑलिम्पिकसाठी आजपासून तयारी करणे आवश्यक आहे.
त्यासाठी नव्या पिढीला पारंपरिक खेळांचे प्रशिक्षण देणे गरजेचे असून, खेळाडूंना फॉर्म-४ प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, जेणेकरून त्यांना क्रीडा कोट्यातून सरकारी नोकरीची संधी मिळू शकेल. कौशल्य व सामाजिक शिक्षणाच्या माध्यमातून सर्वगुण संपन्न पिढी घडविण्याचा सरकारचा संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सहा महिन्यांत साखळीचा कायापालट
साखळी शहरातील विकासकामे सध्या ८० टक्के पूर्ण झाली आहेत. येत्या सहा महिन्यांत शहराचा संपूर्ण चेहरामोहरा बदललेला दिसेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला. सुपाचीपूड ते इस्पितळापर्यंतचा रस्ता, बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभीकरण, दत्तवाडी पुलापर्यंत रस्त्याचा विस्तार, बाजारातील ऐतिहासिक किल्ल्याचे उद्घाटन तसेच वाळवंटी नदीचे सुशोभीकरण ही सर्व कामे लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
रस्ते ग्राहकांसाठी मोकळे ठेवा
बाजारातील दुकानदारांनी दुकानातील साहित्य रस्त्यावर ठेवण्याऐवजी रस्ते मोकळे ठेवल्यास बाजारात ग्राहकांची संख्या वाढेल आणि व्यापारालाही चालना मिळेल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. आठवडी बाजार सोमवारऐवजी रविवारी भरविण्याचा विचार करण्याची गरज असून, यासाठी व्यापाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
साखळीत क्रिकेट अकादमी सुरू करण्याचा मानस
गेल्या ५२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ईगल स्पोर्टस क्लबने साखळीतील क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. पुढील काळात साखळीत क्रिकेट अकादमी सुरू करण्याचा मानस असल्याचे क्लबचे अध्यक्ष प्रशांत फातर्फेकर यांनी स्वागतपर भाषणात सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते फीत कापून, कोनशीला अनावरण, श्रीफळ वाढवून व समई प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. अमोल बेतकीकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदके देऊन गौरविण्यात आले.