मगोला मिळतील त्या जागांवर विजयी होऊ: वीज मंत्री सुदिन ढवळीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:45 IST2025-12-01T12:44:22+5:302025-12-01T12:45:31+5:30
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी फोडला प्रचाराचा नारळ, म्हार्दोळ महालसा मंदिरात गाऱ्हाणे

मगोला मिळतील त्या जागांवर विजयी होऊ: वीज मंत्री सुदिन ढवळीकर
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : आम्ही युतीमध्ये सहभागी झालो असल्याने ज्या काही जागा मगोला मिळतील त्या निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जागा निश्चित झाल्यानंतर मगो केंद्रीय समिती व इतर जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून उमेदवारी संदर्भात निर्णय घेण्यात येतील. दोन दिवसांत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असे प्रतिपादन वीज मंत्री ढवळीकर यांनी केले.
म्हार्दोळ येथील महालसा मंदिरात रविवारी मगो पक्षाच्यावतीने प्रचाराचा नारळ ठेवण्यात आला. यावेळी मंत्री ढवळीकर बोलत होते. यावेळी मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, विविध पंचायतीचे सरपंच व पंचमंडळ केंद्रीय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मगो पक्षाकडे कर्तृत्ववान असे कार्यकर्ते आहेत. मात्र, उमेदवारी काही सर्वांना मिळू शकत नाही हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे. एकत्रितपणे प्रचार करून उमेदवार निवडून आणण्यास प्राधान्य द्यावे, असेही मंत्री ढवळीकर म्हणाले.
विधानसभेची तयारी : दीपक ढवळीकर
निवडणुकीसंदर्भात बोलताना पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले की, परवापर्यंत आमचे उमेदवार निश्चित होतील. त्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात करणार आहोत. आम्ही युतीचा धर्म पाळणार असून, जिल्हा पंचायत निवडणुकीवर जास्त भर देणार नाही. संपूर्ण गोवाभर आम्ही जिल्हा पंचायतीमध्ये उतरणार नाही. परंतु, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी मात्र आम्ही या जिल्हा पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहोत. तूर्तास जिथे युतीचे उमेदवार २ असतील, तेथे मागचे कार्यकर्ते तळमळीने काम करतील.
मगोविषयी जिव्हाळा, मात्र तडजोड नाही : केतन भाटीकर
यावेळी मंदिरात डॉ. केतन भाटीकर हेही उपस्थित होते. त्यांनी तेथेच रुद्रावतार घेतला. दीपक ढवळीकर यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते जिल्हा पंचायत निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. यासंदर्भात बोलताना भाटीकर म्हणाले की, भाजपने कुर्टी जिल्हा पंचायत मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केला आहे. खरे तर मागच्या निवडणुकीत इथे मगोचा उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे या जागेवर मगोने आपला दावा करायला हवा होता.
मात्र, असे झालेले नाही. मगोचे नेते एका बाजूने युतीची भाषा करतात. दुसऱ्या बाजूने भाजपने युती जाहीर व्हायच्या अगोदरच उमेदवार जाहीर केलेले आहेत. त्या मतदारसंघात आमच्याकडे सक्षम असे उमेदवार असून आम्ही युतीच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवणार आहोत व आमचा उमेदवार तिथे नक्की निवडून येईल, अशी व्यूहरचना करणार आहोत. मगोप्रती मला कालही जिव्हाळा आहे, उद्याही राहील. मात्र, कोणत्याही परिस्थितीत तडजोडीचे राजकारण करणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांचा आज हिरमोड झालेला आहे. त्यांच्यामध्ये स्फूर्ती जागवण्याकरिता जिल्हा पंचायत निवडणूक आम्ही लढवणारच, असेही त्यांनी सांगितले.