दक्षिण गोवा भाजपसाठी खडतर; सात जागांवर अपक्षांना पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:33 IST2025-12-05T13:33:00+5:302025-12-05T13:33:33+5:30
मंत्री, आमदारांसमोर आव्हान, अंतिम टप्यात बदल शक्य

दक्षिण गोवा भाजपसाठी खडतर; सात जागांवर अपक्षांना पाठिंबा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपने २०२० च्या जिल्हा पंचायत निवडणुकीत दक्षिण गोव्यात १४ जागा पटकावल्या होत्या. परंतु पक्षाला यंदाच्या निवडणुकीत मात्र सात जागांवर अपक्षांना पाठिंबा द्यावा लागला आहे. दक्षिण गोवा काबीज करणे पक्षाला कठीण आहे पण झेडपी निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होईल.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जर दक्षिण गोव्यात प्रचाराचा जोर वाढवला व माझे घर योजनेच्या मुद्द्यावर भर दिला तर थोडा बदल होऊ शकतो. मात्र काँग्रेस-आरजी-गोवा फोरवर्ड यांच्यात युती झाली तर भाजपसाठी प्रवास आणखी खडतर ठरू शकतो. डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या जि. पं. निवडणुकीत ४८ जागांपैकी भाजपला ३२, काँग्रेसला ४, मगोपला ३, राष्ट्रवादी काँग्रेस व आम आदमी पक्षाला प्रत्येकी १ जागांवर विजय प्राप्त झाला होता. तर ७अपक्ष उमेदवार निवडून आले होते.
नावेली मतदारसंघात उमेदवाराचा आकस्मिक मृत्यू झाल्याने या मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलावी लागली होती तर सांकवाळ मतदारसंघात भाजप उमेदवार आधी बिनविरोध निवडून आल्या होत्या.
भाजपने आतापर्यंत ४० उमेदवार जाहीर केले आहेत. नुवें, बाणावली, वेळ्ळी, गिर्दोली व इतर काही ठिकाणी उमेदवार पक्ष उमेदवार देऊ शकलेला नाही. कवळे, वेलिंग-प्रियोळ व मोरजी या तीन जागा मगोपला दिलेल्या आहेत. सात ठिकाणी भाजप अपक्षांना पाठिंबा देणार आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार पल्लवी धेंपो यांचा पराभव झाला. काँग्रेसचे विरियातो फर्नाडिस निवडून आले. त्यामुळे भाजपलाही कळून आले की दक्षिण गोव्यात काँग्रेसचा प्रभाव आहे. भाजपने मध्यंतरी कुडचडेत आमदार नीलेश काब्राल यांना मंत्रिपदावरुन दूर केले. नंतर वेळोवेळी मंत्रिमंडळाची फेररचना झाली. परंतु काब्राल यांना मंत्रिमंडळात काही स्थान दिले नाही.
काब्राल सध्या भाजप उमेदवाराचा प्रचार करत आहेत. परंतु ते उमेदवारांना किती मते मिळवून देतात पाहावे लागेल. २०२० च्या जि. पं. निवडणुकीत आम आदमी पक्षाने बाणावलीची जागा जिंकून खाते उघडले होते.
परंतु पक्षाचा हा आनंद औट घटकेचा ठरला. तेथे निवडून आलेले आपचे हैंझेल फर्नांडिस यांच्या ओबीसी जात पडताळणी दाखल्यास हायकोर्टात आव्हान देण्यात आले.
हायकोर्टाने त्यांचा दाखला अवैध ठरवत त्यांची निवड रद्दबातल ठरवल्याने तेथे पोटनिवडणूक घ्यावी लागली. अर्थात काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यावर आम आदमी पक्षाचेच जोझेफ पिमेंता हे तेथे निवडून आले. जोझेफ आता पुन्हा रिंगणात आहेत.
नुवेत स्थिती नाजूक
लोकसभा निवडणुकीवेळी नुवे मतदारसंघात आलेक्स सिक्वेरा मंत्री असूनही भाजप उमेदवाराला मते मिळवून देऊ शकले नव्हते. तेथे भाजपची स्थिती अजूनही नाजूक आहे. काणकोणमध्ये मंत्री रमेश तवडकर यांनी आपल्या समर्थकांची फौज अबाधित ठेवली आहे. यावेळी पैंगीणमध्ये लढत थोडी रंगतदार होत आहे.
विधानसभेची सेमीफायनल
२०२० च्या जि. पं. निवडणुकीत उत्तरेत १०४ आणि दक्षिणेत २६ मिळून २०० उमेदवार रिंगणात होते. ती २०२२ च्या विधानसभा निवडणुकीची सेमिफायनल होती. त्यामुळे सत्ताधारी तसेच विरोधी आमदारांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती.
येत्या २० डिसेंबरला होणारी निवडणूकही आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची सेमिफायनल मानली जात आहे. पंचायत निवडणुकीच्या आधीच्या, २०१५ च्या जिल्हा तुलनेत २०२० च्या निवडणुकीत १० टक्के कमी मतदान झाले होते. त्यावेळी कोविड महामारीपासून खबरदारी म्हणून लोकांनी घरात बसणे पसंत केले होते.
१२ उमेदवारांचे अर्ज
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काल, गुरुवारी आणखी १२ उमेदवारांनी अर्ज सादर केले. राज्य निवडणूक आयोग कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार कळंगुट मतदारसंघात भाजपच्या फ्रांझिलिया सेलीन रॉड्रिग्स, सुकूरमध्ये भाजपचे अमित देविदास अस्नोडकर, रेईश-मागुशमध्ये भाजपच्या रेश्मा संदीप बांदोडकर व सुष्मिता सुभाष पेडणेकर, पेन्ह द फ्रान्समध्ये भाजपचे संदीप दत्ताराम साळगांवकर यांनी अर्ज सादर केले. तर दक्षिण गोवा जिल्ह्यातील उसगांव-गांजेमध्ये काँग्रेसच्या मनिषा उसगांवकर, बेतकी-खांडोळा मतदारसंघात अपक्ष सुनील धर्मा जल्मी, सावर्डेत भाजपचे मोहन परशुराम गांवकर, धारबांदोड्यात भाजपचे रुपेश रामनाथ देसाई तर पैंगीणमध्ये दीक्षा दया पागी व विपिन केशव प्रभुगांवकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्यास ९ पर्यंत मुदत आहे.