गुंडाराज, माफियाराज संपविण्याची गरज: आरोग्य मंत्री विश्वजीत राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:46 IST2025-12-17T11:45:38+5:302025-12-17T11:46:43+5:30
उसगाव व इतरत्र भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेवेळी आक्रमक विधाने

गुंडाराज, माफियाराज संपविण्याची गरज: आरोग्य मंत्री विश्वजीत राणे
लोकमत न्यूज नेटवर्क, उसगाव/वाळपई : गोव्यात माफियाराज व गुंडाराज संपविण्याची गरज आहे. बाहेरून गोव्यात येणाऱ्या काही घटकांकडून आगळीक केली जाते. किनारपट्टी भागासह अन्यत्र माफियाराजविषयक तक्रारी येतात. हे माफियाराज संपविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल मंगळवारी केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना याविषयी मी पत्र लिहिन व आपली भूमिका सविस्तर मांडीन, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
उसगाव भागात मंत्री राणे यांच्या दोन दिवस अनेक कोपरा बैठका झाल्या. काही बैठकांवेळी मंत्री राणे यांनी कायदा सुव्यवस्थेच्या विषयाबाबत आक्रमक भूमिका मांडली. गुंडाराज व माफियाराज संपविण्यासाठी उत्तर प्रदेशप्रमाणे गोव्यात कारवाई करावी लागेल, असे मंत्री राणे म्हणाले. गोव्याची व गोमंतकियांची सुरक्षा महत्त्वाची आहे, त्यासाठी कडक भूमिका घ्यावी लागेल, असे राणे म्हणाले.
'पार्ट्यांसाठी मदत करत नाही'
लोकसेवेसाठी मी राजकारणात आलो. मी कधीच दारुच्या पार्त्या करण्यासाठी कोणाला आर्थिक मदत करत नसतो. युवक व्यसनाधीन झालेले मला नको. कोणाला शैक्षणिक कामासाठी, गरिबांना घर बांधण्यासाठी किंवा वैद्यकीय खर्चासाठी मी मदतीचा हात देतो. अनेक वर्षे हे काम आम्ही करत आलो आहोत, लोकांची चूल पेटायला हवी, पुरेसे अन्नधान्य प्रत्येक गरिबाला मिळायला हवे, हे माझे धोरण आहे, असे राणे म्हणाले. सबका साथ, सबका विकास, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. सर्व जाती-धर्माचे लोक आमचे असून, त्यांच्याशी संवाद व संपर्क
वाढविण्याचे काम आम्ही करतो, असे राणे म्हणाले. नाइट क्लब रात्री बारा वाजता बंद व्हायलाच हवेत. नाइट लाइफवर नियंत्रण हवे, अन्यथा युवा पिढी व्यसनाधीन होईल, असे राणे म्हणाले.
'धर्मांत राजकारण आणू नका'
धर्माच्या गोष्टी राजकारणात आणू नका. मी सर्व धर्म मानतो. राजकारणात हिंदू ख्रिस्ती, मुस्लिम सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. धार्मिक सलोखा कायम राहिला पाहिजे. मी सर्व समाजातील व धर्मातील लोकांना सोबत घेऊन पुढील वाटचाल करणार आहे, असे राणे यांनी बाळी जुवे, म्हारवासडा येथे कोपरा बैठकीत सांगितले. यावेळी गांजे जिल्हा पंचायत मतदारसंघाच्या भाजप उमेदवार समीक्षा नाईक, जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, सरपंच संजय उर्फ प्रकाश गावडे, उपसरपंच संगीता डोईफोडे, पंच सदस्य रामनाथ डांगी, गोविंद परब फात्रेकर, नरेंद्र गावकर, राजेंद्र नाईक, विनोद मस्कारेन्हस, विलियम मस्कारेन्हस, रेश्मा मटकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे उपस्थित होते.
प्राचीन मंदिरांचे नूतनीकरण करणार
मंत्री राणे म्हणाले, की देवस्थान समिती व महाजन यांची मान्यता मिळाल्यानंतर उसगावातील आदिनाथ, भूमिका व साईबाबा मंदिरांचे नूतनीकरण केले जाणार आहे. आदिनाथ मंदिर हे प्राचीन मंदिर आहे. मी समाजात भेदभाव न करता युवा पिढीला सरकारी नोकऱ्या मिळवून देणार आहे.
उसगावच्या काँग्रेस उमेदवार फक्त माझ्याविरोधात रिल काढत असतात. त्याशिवाय त्यांना आणखी काही कामच नाही. काँग्रेसचे लोक सत्तरीच्या विरोधात आहेत. त्यांच्यात विकासकामे करण्याची धमक नाही, अशी टीका राणे यांनी केली.
विधानसभा मतदारसंघात असो अथवा जिल्हा पंचायत निवडणूक असो काँग्रेस पक्षाकडे उमेदवारच नाही. त्यामुळे ते मिळेल त्यांना उमेदवारी येतात. काँग्रेस पक्ष सत्तेवर येणारच नाही, असे मंत्री राणे म्हणाले. उमेदवार समीक्षा नाईक यांनी आपले विचार व्यक्त केले. आज १७ रोजी सायं. ५:०० वा. उडीवाडा उसगाव येथील अंबा भवानी मंदिरसमोर - राणे यांची सभा होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.