गोवा जागतिक चित्रपट निर्मितीचे केंद्र बनवू: मुख्यमंत्री; पणजीत ५६ व्या इफ्फीचे थाटात उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 12:43 IST2025-11-21T12:42:00+5:302025-11-21T12:43:37+5:30
ज्येष्ठ तेलगू अभिनेता नंदमुरी बालकृष्ण यांचा विशेष गौरव

गोवा जागतिक चित्रपट निर्मितीचे केंद्र बनवू: मुख्यमंत्री; पणजीत ५६ व्या इफ्फीचे थाटात उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'गोवा जागतिक चित्रपट निर्मिती केंद्र बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ५६ व्या इफ्फीच्या उद्घाटन प्रसंगी केले. येथील जुन्या गोमेकॉ इमारतीच्या आवारात झालेल्या या दिमाखदार सोहळ्याला राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, ज्येष्ठ तेलगू अभिनेता, निर्माता नंदमुरी बालकृष्ण, अनुपम खेर, चित्रपट महोत्सवाचे संचालक शेखर कपूर व इतर उपस्थित होते. तुळशीच्या रोपट्याला पाणी देऊन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'चित्रपट निर्माते गोव्यात केवळ नैसर्गिक सौंदर्य असल्यामुळेच नव्हे तर येथील पायाभूत सुविधांमुळे चित्रीकरणासाठी येतात. गोवा नेहमीच सृजनशीलतेला प्राधान्य देतो. इफ्फीसोबत गोव्याचाही विकास झालेला आहे. जागतिक स्तराच्या पायाभूत सुविधा देण्यास आम्ही सज्ज आहोत.'
सावंत म्हणाले की, '२०१४ साली गोव्याला इफ्फीचे कायम स्थळ म्हणून मान्यता मिळाली. यात माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे फार मोठे योगदान आहे. आम्ही जागतिक दर्जाच्या सुविधा देताना सृजनशीलता व तंत्रज्ञानाला वाव दिला. चित्रपट निर्मितीसाठी आम्ही वित्तीय साहाय्य उपलब्ध केले तसेच एक खिडकी योजना प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न आहे' असे यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी सांगितले.
सांस्कृतिक विविधता जगासमोर आणू
मुख्यमंत्री म्हणाले की, 'इफ्फीच्या माध्यमातून गोव्याची सांस्कृतिक विविधता जगासमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच यंदा शिमगो, कार्निव्हलसारख्या परेडचे आयोजन आम्ही केले. चित्रपट निर्मिती सुलभ आणि अधिक कार्यक्षम करण्यासाठी आखण्यात आलेल्या धोरणात्मक सुधारणांमुळे गोवा हे पसंतीचे चित्रीकरण स्थळ बनले आहे. गोमंतकीयही सिनेनिर्मिती करू लागले आहेत. इफ्फीच्या एका विभागात दोन गोमंतकीय चित्रपट आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याने भारतीय सिनेमा जागतिक उंचीवर पोचवण्यासाठी गोवा प्रवेशद्वार आहे.'
सुवर्णमहोत्सवी कारकिर्दीबद्दल बालकृष्ण यांचा सत्कार
अभिनय क्षेत्रात ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल नंदमुरी बालकृष्ण यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. बालकृष्णन यांच्या चित्रपट सृष्टीतील आजवरच्या कामगिरीचा या इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यात खास गौरव करण्यात आला. कार्यक्रमावेळी 'वंदे मातरम' या राष्ट्रीय गीताचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव देशभर साजरा करत असतानाच जेवॉन किम यांनी सादर केलेल्या या गीताने वाहवा मिळवली. प्रेक्षकांनी त्यांना उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या कार्यक्रमादरम्यान वाहतूक अन्य मार्गान वगळण्यात आली होती.
८१ देशांचे २७० चित्रपट
उद्घाटनानंतर ब्राझिलियन चित्रपट निर्माता गाब्रिएल मास्कारो यांच्या 'द ब्ल्यू ट्रेल' या चित्रपटाने इफ्फीचा प्रारंभ झाला. २८ नोव्हेंबरपर्यंत नऊ दिवसांच्या काळात एकूण ८१ देशांचे २७० हून अधिक चित्रपट इफ्फीत दाखवले जाणार आहेत. समारोप सोहळ्यात दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
कनेक्टिव्हिटी जमेची बाजू : राज्यपाल
राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू म्हणाले की, 'इफ्फी गोव्यात आणण्याबरोबरच कायम स्थळ म्हणून मान्यता मिळवण्यात दिवंगत पर्रीकर यांचे फार मोठे योगदान आहे. माझ्यासाठी इफ्फीचा हा पहिला अनुभव आहे. गोव्यात कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी असल्याने इफ्फीसाठी ती जमेची बाजू ठरली आहे.'
केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन म्हणाले की, 'यंदा इफ्फीचे उद्घाटन आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले. विविध राज्यांची सांस्कृतिक परंपरा, सांस्कृतिक उपक्रम प्रदर्शित करणारे चित्ररथ परेडमधून लोकांना पहायला मिळाले. सामग्री, सर्जनशीलता आणि संस्कृती हे अर्थव्यवस्थेचे तीन आधारस्तंभ आहेत. नवीन निर्मात्यांना वाव दिला जात आहे.'
१३ जागतिक प्रिमियर
आंतरराष्ट्रीय विभाग व इंडियन पॅनोरमा या इफ्फीतील विभागांमध्ये यावर्षी गाजलेले चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना लाभणार आहे. आंतरराष्ट्रीय विभागात १६० चित्रपट प्रदर्शित केले जातील. यात १३ जागतिक प्रिमियरचा समावेश असेल. २१ अधिकृत ऑस्कर नामांकन मिळालेले चित्रपट प्रदर्शित केले जातील. सिने कलाकार, तंत्रज्ञ यांची मोठी उपस्थिती पुढील नऊ दिवसांच्या काळात इफ्फीला लाभणार आहे.