देशी पाहुण्यांनी गजबजला गोवा

By Admin | Updated: October 3, 2014 01:14 IST2014-10-03T01:12:40+5:302014-10-03T01:14:00+5:30

किनाऱ्यांवर गर्दी : पाच दिवसांचा विकएंड मिळाल्याने हॉटेल्स फुल्ल

Goa tourists celebrate Goa | देशी पाहुण्यांनी गजबजला गोवा

देशी पाहुण्यांनी गजबजला गोवा

पणजी : सलग पाच दिवसांचा विकएंड मिळल्याने देशी पर्यटकांनी गोव्यात गर्दी केली असून राजधानी पणजीसह अनेक शहरांमधील हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. कळंगुट, हणजूण, कोलवा, माजोर्डा, बेताळभाटी आदी किनारी भागातही हॉटेलांमधील खोल्या फुल्ल आहेत.
अखिल गोवा हॉटेलमालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, की गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र अशा जवळजवळ सर्वच राज्यांमधून देशी पाहुणे आले आहेत. गुरुवारी गांधी जयंती, शुक्रवारी दसरा, शनिवार-रविवारी कार्यालयीन सुट्टी आणि सोमवारी बकरी ईद अशी सलग पाच दिवसांची सुट्टी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली आहे.
पहिले चार्टर विमान १५ आॅक्टोबर रोजी दाखल होणार असले तरी देशी पाहुण्यांच्या जोरदार सलामीने गोव्यात पर्यटन मोसम चालू झाल्यासारखीच स्थिती आहे. गुरुवारी कळंगुट, बागा, मिरामार, हणजूण, कोलवा, बेताळभाटी आदी सर्व किनारे देशी पर्यटकांनी गजबजले होते. सुट्टी असूनही बाजारपेठांमध्येही गर्दी दिसत होती.
कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांना विचारले असता, जवळजवळ सर्व ठिकाणांहून गोव्यात येणाऱ्या रेल्वेगाड्या फुल्ल भरून येत असल्याचे तसेच पुढील चार दिवसांत परतीचेही आरक्षण फुल्ल असल्याचे त्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)

Web Title: Goa tourists celebrate Goa