दुहेरी खुनामुळे गोवा हादरला, साळगाव येथील घटना; गळ्यावर सुऱ्याने वार करून संशयित रेल्वेने पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 07:48 IST2025-11-07T07:47:14+5:302025-11-07T07:48:00+5:30
धारदार शस्त्राने वार करून हे खून करण्यात आले आहेत.

दुहेरी खुनामुळे गोवा हादरला, साळगाव येथील घटना; गळ्यावर सुऱ्याने वार करून संशयित रेल्वेने पसार
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : मोरजी येथील रहिवासी उमाकांत खोत यांच्या बुधवारी झालेल्या संशयास्पद खून प्रकरणाच्या दुसऱ्याच दिवशी मुडोवाडा-साळगाव येथे दुहेरी खुनाचा प्रकार दुपारी उघडकीस आल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. मुड्डोवाडा येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या पाठीमागील बाजूला असलेल्या भाड्याच्या खोलीत दुहेरी खुनाचा हा धक्कादायक प्रकार घडला. धारदार शस्त्राने वार करून हे खून करण्यात आले आहेत.
रिचर्ड डिमेलो (५०, रा. गिरी) आणि अभिषेक गुप्ता (४५, रा. इंदोर) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. या खोलीत वास्तव्यास असलेल्या छत्तीसगडमधील जगन्नाथ भगत याचा खुनामागे हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, या घरात अभिषेक गुप्ता हा आणखी एका व्यक्तीसह भाड्याने राहत होता. खुनाची घटना गुरुवारी पहाटे घडल्याचा संशय पोलिसांना आहे. अभिषेक याच्यासोबत आणखी एक साथीदार खोलीत राहत होता. रिचर्ड हा मित्र अभिषेकला भेटायला बुधवारी रात्री त्या खोलीवर आला होता. त्यावेळी तिघांमध्ये निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसान खुनात झाल्याचे तपासात आढळले आहे.
स्थानिकांनी या खून प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर साळगाव पोलिस तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी तपास सुरू केला. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक विश्वेश कर्पे, निरीक्षक मिलिंद भुईबर यांसह अन्य अधिकारीही घटनास्थळी आले. त्यांनी मृतांची ओळख पटवली. फॉरेन्सिक तज्ज्ञांना आणि श्वानपथकाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
मृत रिचर्ड डिमेलो हे तृणमूल काँग्रेसचे नेते ट्रोजन डिमेलो यांचे बंधू होत. रिचर्ड हे संगीत व्यवसायात कार्यरत होते. सोनू हा रिचर्डसोबत संगीत व्यवसायात होता. तर रिचर्ड यांनीच संशयिताला पाच दिवसांपूर्वी या खोलीत आणले होते.
मृत दोघेही संगीत व्यवसायात
घटनेनंतर पंचनामा करून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे गोमेकॉत पाठविण्यात आले. घटनेच्या आदल्या दिवशी, बुधवारी रात्री रिचर्ड हा सोनू सिंग याच्या खोलीवर आला होता, असे पोलिसांना आढळले.
भाडेकरू पडताळणी गरजेचे
दुहेरी खुनाच्या या घटनेनंतर कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी भाडेकरू पडताळणीतील त्रुटींमुळे गुन्हेगारी वाढल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, नोकरीनिमित्त किनारी भागात येणाऱ्या परप्रांतीयांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यात झारखंड, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांतील आणि बांगलादेशातील नागरिकांचाही समावेश होतो. भाडेकरूंची पडताळणी केली जात नाही. सुमारे ६० टक्क्यांहून अधिक भाडेकरूंची पडताळणी होणे आवश्यक आहे. पोलिसांना पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दोघांच्या गळ्यावर वार
बुधवारी रात्री तिघांमध्ये वाद झाल्यानंतर संशयिताने सुऱ्याचा वापर करून दोघांच्याही गळ्यावर तसेच मानेवर सपासप वार केले असावेत असे पोलिसांना आढळून आले. घरात दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. खुनामागचे कारण मात्र रात्री उशीरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. खून करण्यासाठी वापरलेले हत्यार संशयिताने घटनास्थळीच टाकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. हे हत्यार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
थिवी रेल्वे स्थानकावर सापडली दुचाकी
खून केल्यानंतर संशयित रिचर्ड याच्या दुचाकीवरून पसार झाल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी संशयिताच्या शोधासाठी विशेष पथकांची स्थापना केली आहे अशी माहिती अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली. संशयित गोव्या बाहेर पळून गेल्याचा संशय आल्याने पोलिसांनी सीमावर्ती भागातील सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी केली. थिवी रेल्वे स्थानकावरही शोधमोहीम राबवली. यांदरम्यान, संशयिताने वापरलेली रिचर्ड यांची स्कूटर थिवी रेल्वे स्टेशन परिसरात सापडली. संशयित मांडवी एक्स्प्रेसने गेल्याची माहिती उघड झाली असून तपासासाठी मुंबईकडे पथके पाठवण्यात आली आहेत.