Goa: आरजीची हुल्लडबाजी पूर्वनियोजित, सुदिन ढवळीकर यांचा आरोप

By किशोर कुबल | Published: March 3, 2024 01:47 PM2024-03-03T13:47:07+5:302024-03-03T13:47:32+5:30

Goa News: आरजीची हुल्लडबाजी हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप करीत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे कडक कारवाईची मागणी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.

Goa: RG riots premeditated, Sudin Dhavalikar alleges | Goa: आरजीची हुल्लडबाजी पूर्वनियोजित, सुदिन ढवळीकर यांचा आरोप

Goa: आरजीची हुल्लडबाजी पूर्वनियोजित, सुदिन ढवळीकर यांचा आरोप

- किशोर कुबल 
पणजी - आरजीची हुल्लडबाजी हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप करीत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे कडक कारवाईची मागणी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. ढवळीकर म्हणाले की , 'दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मी अकरा जणांची नावे दिली होती. मडकई, फोंडा भागात याच व्यक्ती नेहमी गोंधळ घालत असतात. बोरी प्रकल्प तसेच मलनि:सारण व इतर प्रकल्पांना याच लोकांनी खो घातला. काल मडकई येथे याच लोकांनी हंगामा केला.'

ढवळीकर म्हणाले की 'मी कोणालाही अपशब्द वापरलेले नाहीत. तुम्ही येथे का आला आहात! एवढेच मी बोट वर करून मोठ्या आवाजात विचारले. काल सकाळी पावणे सातच्या सुमारास आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचा मला फोन आला. आरजीचे लोक गोंधळ घालणार आहेत, अशी कल्पना त्यांनी मला दिली. त्यानंतर मी पोलीस निरीक्षकांना फोन करून फार्मागुढी येथून विश्वजीत यांना बंदोबस्तात बांदोडा येथे आणण्यास सांगितले. फार्मागुडी येथे पोचल्यावर विश्वजीत यांनी आपण परत जातो असे मला कळविले. परंतु मी त्यांना सांगितले की, कार्यक्रमासाठी एक हजार लोक जमलेले आहेत. त्यांना नाराज करू नका. तुम्ही या. पोलीस निरीक्षक व मामलेदारांकडे मी बोललेलो आहे. कोणताही गैरप्रकार होणार नाही.'
माझ्या आश्वासनानंतर विश्वजीत कार्यक्रमस्थळी आले. 

'समस्या मांडायला नव्हे तर हंगामा करायला झाले होते'
 'विकसित भारत' सभेत मडकई मतदारसंघातील सहा ग्रामपंचायतींचे लोक आपल्या समस्या मांडणार होते. सरपंचही उपस्थित होते. लोकांची निवेदने घेण्यासाठी गटविकास अधिकारी बसले होते. परंतु ज्यांनी हुल्लडबाजी केली त्यांच्यापैकी एकानेही गटविकास अधिकाऱ्यांना कोणतेही निवेदन दिले नाही. ते समस्या मांडायला आले नव्हते तर हंगामा करायला झाले होते. या ठिकाणी आम आदमी पक्षाचेही कार्यकर्ते होते. परंतु ते शांत बसून होते. केवळ आरजीच्याच लोकांनी गैरकृत्य केले. हे लोक समाजाला कलंक आहेत. मी काहीही गैर बोललो नसताना माझ्याबद्दल अपप्रचार केला व माझे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मी कोणाच्याही गळ्याला धरायला गेलो नाही किंवा आजवर कोणालाही अपशब्द वापरलेले नाहीत. उलट विश्वेशाने माझ्याबद्दल माझ्याच मालमत्ते देऊन गैर शब्द वापरलेले आहेत. या लोकांमुळे समाजाचे फार मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वेळीच हस्तक्षेप करून या लोकांना अद्दल घडवायला हवी. या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता लोकसभा निवडणुकीत मडकईत या लोकांना किती मते मिळतात हे दिसून येईलच. या लोकांवर आताच कारवाई न  केल्यास काट्याचा नायटा होईल व ते समाजालाही भारी पडणार आहे,अशी भीती ढवळीकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Goa: RG riots premeditated, Sudin Dhavalikar alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा