अमित शाहंसोबत मंत्री विश्वजीत राणेंची चर्चा; दिल्लीत गाठीभेटी जोरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 10:53 IST2025-10-07T10:52:28+5:302025-10-07T10:53:35+5:30
बैठकीत विविध विषय : भाजपचे राष्ट्रीय सचिव बी.एल. संतोष यांचीही भेट

अमित शाहंसोबत मंत्री विश्वजीत राणेंची चर्चा; दिल्लीत गाठीभेटी जोरात
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल सोमवारी दिल्ली गाठली. दिल्लीत त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली. तसेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनाही ते भेटले.
शाह हे दोन दिवसांपूर्वीच गोव्यात येऊन गेले होते. शाह यांच्या हस्तेच गोव्यात माझे घर योजनेचे उद्घाटन झाले होते. त्यावेळी मंत्री राणे हे स्वतंत्रपणे गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलू शकले नव्हते. राणे यांनी काल दिल्लीत शाह यांच्यासोबत चर्चा केली. तसेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस संतोष यांचीही राणे यांनी भेट घेतली. गोव्यात भाजपचे काम आणखी वाढविण्यासाठी युवकांकरिता काही उपक्रम राबविण्यावर चर्चा झाली. आपल्या दिल्ली भेटीची व गाठीभेटींची माहिती नंतर मंत्री राणे यांनी फोन करून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना दिली.
दरम्यान, सध्या केंद्रीय नेतृत्व बिहारच्या विधानसभा निवडणुकीत व्यस्त असेल. त्यानंतर गोव्यातील राजकारणाकडे केंद्रीय नेते अधिक लक्ष देणार आहेत, अशी माहिती मिळाली. गोव्यात पुढील विधानसभा निवडणूक ही भाजपने मगोसोबत युती करूनच लढवावी या मताशी केंद्रीय नेते ठाम असल्याचे समजते.
सुदिनचीही स्वतंत्र चर्चा
दरम्यान, अमित शाह हे गोव्यात शनिवारी सोहळ्यासाठी आले होते तेव्हा ग्रीन रुममध्ये शहा यांनी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना बोलावले. ढवळीकर यांच्याशी अगदी स्वतंत्रपणे शाह यांनी चर्चा केली. त्यावेळी ग्रीन रुममध्ये आणखी कुणीच उपस्थित नव्हते पण आत शाह हे ढवळीकर यांच्याशी चर्चा करत असल्याचे अन्य मंत्री, आमदारांना कळून आले. ढवळीकर कोणत्या विषयांवर बोलले हे कुठल्याच मंत्र्याला किंवा भाजपच्या गोव्यातील नेत्यांना कळाले नाही.