विकासात गोवा गेला १४० वर्षे मागे; महिला काँग्रेसचा आरोप, कायदा व सुव्यवस्था ढासळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 08:20 IST2026-01-31T08:20:02+5:302026-01-31T08:20:02+5:30
गोवा मागील १४ वर्षात विकासाच्या नावाने १४० वर्ष मागे गेला आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे, असा आरोप गोवा महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसांनी केला.

विकासात गोवा गेला १४० वर्षे मागे; महिला काँग्रेसचा आरोप, कायदा व सुव्यवस्था ढासळली
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोवा मागील १४ वर्षात विकासाच्या नावाने १४० वर्ष मागे गेला आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळलेली, अमलीपदार्थ समस्या, भू माफिया, महिला अत्याचार घटनांमध्ये राज्यात वाढ झाल्याचा आरोप गोवा महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस शिल्पी अरोरा यांनी पत्रकार परिषदेत केला.
सध्याचा गोवा आम्ही कल्पना करीत असलेला गोवा यात मोठा फरक आहे. एकूणच सध्याची राज्याची स्थिती पाहता भाजप सरकारला त्यावर नियंत्रण मिळवण्यास पूर्णपणे अपयश आले असून त्याची जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
अरोरा म्हणाले, की गोव्यात अगोदर केवळ एक ते दोन कॅसिनो होते. मात्र आता त्यांची संख्या वाढत आहे. अमलीपदार्थांचा विळखा, महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये होणारी वाढ यामुळे गोव्याचे नाव खराब होत आहे. मात्र सरकारचे कुठलेही नियंत्रण नाही. त्याविरोधात महिला काँग्रेस आपला आवाज उठवणार आहे. महिला काँग्रेसकडून सध्या राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देत आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कामही सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. प्रतिक्षा खलप म्हणाल्या, की गोव्याचे नाव बदनाम करणारे अॅप, संकेतस्थळे सध्या सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर सहासपणे पाहण्यास मिळत आहे. अशा अॅप, संकेतस्थळांवर कारवाई व्हावी. एका रशियन व्यक्तीने काही महिलांचा खून केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आहे. यावरुन पोलिसांकडून भाडेकरूंची व्यवस्थित पडताळणी होत नाही हे स्पष्ट होते.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्ण ढासळलीच असून यामुळे गोव्यातील पर्यटन उद्योगावरही परिणाम होण्याची भीती असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गोवा महिला कांग्रेसच्या सह प्रभारी अॅड. प्रज्योती हंडोरे व शबनम खान उपस्थित होते.