Goa Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेसची पाटी कोरीच; लक्षवेधक कामगिरी नाहीच, नावापुरतेच उरले कार्यकर्ते

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 09:28 AM2022-01-25T09:28:53+5:302022-01-25T09:29:24+5:30

Goa Election 2022: गोव्यात येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांनीही फारसे काही केलेले नाही, असे सांगितले जात आहे.

goa election 2022 ncp not only remarkable performance but the rest of the activists in name only | Goa Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेसची पाटी कोरीच; लक्षवेधक कामगिरी नाहीच, नावापुरतेच उरले कार्यकर्ते

Goa Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेसची पाटी कोरीच; लक्षवेधक कामगिरी नाहीच, नावापुरतेच उरले कार्यकर्ते

Next

प्रसाद म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क

म्हापसा : थिवी मतदार संघातून २००७ साली राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडून येऊन नंतर मंत्री झालेले विद्यमान आमदार नीळकंठ हळर्णकर यांचा हा एकमेव अपवाद वगळता तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला लक्षवेधक कामगिरी करून दाखवता आली नाही. गेल्या दोन निवडणुकीत तर पक्षाकडून रिंगणात उतरवलेल्या उमेदवारांना निराशजनक कामगिरीबरोबर अनामत रक्कम जप्त होण्यास सामोरे जावे लागले आहे. आता तर बार्देशात पक्षाची पाटी कोरीच राहिली. 

२००७ सालच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी तसेच काँग्रेस पक्षाच्या झालेल्या युतीच्या जोरावर राज्यातून राष्ट्रवादीचे तीन उमेदवार विधानसभेवर निवडून आले होते. त्यात थिवी मतदार संघातून तत्कालीन आमदार नीळकंठ हळर्णकर यांचा समावेश होता. त्यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार सदानंद तानावडे यांचा अटीतटीच्या लढतीत सुमारे ३५० मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादीचे हे एकमात्र यश वगळता त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांच्या पदरी अपयशच पडले आहे. 

नीळकंठ हळर्णकरांच्या या विजयानंतर २०१२ च्या निवडणुकीत त्यांना थिवीतून भाजप उमेदवार किरण कांदोळकरांकडून पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे साळगाव, म्हापसा तसेच पर्वरी या इतर तीन मतदार संघातून उमेदवार उतरवले होते; पण मतदारांवर ते आपला प्रभाव टाकू शकले नाहीत. त्यामुळे त्या निवडणुकीपासूनच ताकद कमी झाली. 

पुन्हा २०१७ च्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीकडून उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले. यात शिवोली, थिवी, म्हापसा तसेच हळदोणा या मतदारसंघांचा त्यात समावेश होता. मात्र पक्षाच्या उमेदवारांचा उल्लेख करावा, अशी कामगिरी करुन दाखवता आली नाही. अवघी काही मते त्यांच्या पदरात पडल्याने उमेदवारांची निराशजनक कामगिरी दिसून आली. कळंगुट मतदारसंघातून तर या पक्षाला रिंगणात उतरवण्यासाठी अद्यापपर्यंत उमेदवार सापडू शकला नाही. 

गट स्तरावर अस्तित्व शून्य 

राष्ट्रवादीच्या अपयशाला विविध कारणे असली तरी त्यातील प्रमुख कारण म्हणजे गट स्तरावरील पक्षाची कामगिरी. काही मतदार संघातून पक्षाच्या समित्यासुद्धा अस्तित्वात असल्याचे दिसून येत नाही. जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नावापुरते कार्य आहे.

हळर्णकर भाजपमध्ये 

२००७ साली राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आलेल्या नीळकंठ हळर्णकर यांनी पुन्हा २०१२ ची निवडणूक राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर लढवली. त्यानंतर २०१७ ची निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर लढवली. तर आता ते भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवत आहेत. पक्षाने आपल्याकडील नेते, कार्यकर्ते टिकावेत यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत, असेच दिसते.

इतरांनी उमेदवारी नाकारली की...

इतर पक्षाकडून उमेदवारी नाकारलेल्या उमेदवारांनी पर्याय म्हणून शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेऊन निवडणूक लढवली. त्याचेही परिणाम पक्षावर झाले.  अशाने तालुक्यात कोठेही कार्यकर्त्यांची नवी फळी तयार होऊ शकली नाही. कार्यकर्ते नसल्याने बूथ स्तरावर काम करण्याचा प्रश्नच येत नाही. उत्तर गोवा जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व नगण्य राहिले आहे. निवडणुकीच्या काळात राज्यात येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांनीही फारसे काही केलेले नाही.
 

Web Title: goa election 2022 ncp not only remarkable performance but the rest of the activists in name only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.