Goa Election 2022 : ४८ टक्के अल्पसंख्याक मतदारांवर नजर; राज्यातील २४ मतदारसंघातील चित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 16:24 IST2022-02-03T16:24:27+5:302022-02-03T16:24:50+5:30
Goa Election 2022 : राज्यातील सर्व ४० मतदारसंघात निवडणुकीचा रणसंग्राम जोरात सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, यातही जवळपास २४ मतदारसंघात प्राबल्य असलेल्या अल्पसंख्याक मतदारांवर उमेदवारांनी आपली नजर ठेवली आहे. त्यांची मते मिळविण्यासाठी डावपेच आखले आहेत.

Goa Election 2022 : ४८ टक्के अल्पसंख्याक मतदारांवर नजर; राज्यातील २४ मतदारसंघातील चित्र
किशोर कुबल
पणजी : राजधानी शहराचा समावेश असलेल्या पणजी मतदारसंघात २८ टक्के ख्रिस्ती आणि ८ टक्के मुस्लीम आहेत. मुख्य टपाल कार्यालयाच्या मागील बाजूस, तसेच चर्च स्क्वेअर परिसर ख्रिस्तीबहुल असून, या भागातील मते पारंपरिकपणे काँग्रेस उमेदवारालाच जातात. मिरामार येथील बूथ क्रमांक २६, होम सायन्स कॉलेजच्या २७ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरही नेहमीच काँग्रेसला आघाडी मिळते. मतदारसंघात बाबुश मोन्सेरात (भाजप), उत्पल पर्रीकर (अपक्ष) एल्विस गोम्स (काँग्रेस) राजेश विनायक रेडकर (रिव्हॉल्युशनरी गोवन्स), वाल्मिकी नायक (आप) हे प्रमुख उमेदवार व दोन अपक्ष रिंगणात आहेत.
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी अनुक्रमे बाबूश मोन्सेरात व एल्विस गोम्स असे ख्रिस्ती उमेदवार दिलेले आहेत. हे दोघे वगळता या मतदारसंघात उर्वरित सर्व उमेदवार हिंदू आहेत. मतदारसंघात ६२४६ ख्रिस्ती मतदार असून, यात १५०० मतदार ख्रिस्ती सारस्वत आहेत. ही १५०० मते आजपर्यंत दिवंगत मनोहर पर्रीकरांच्या पारड्यात जात असत.
यावेळी ही मते उत्पल यांच्याकडे वळू शकतात. सांतइनेज येथे पालासिओ द गोवा हॉटेलच्या परिसरात मुस्लीम मतदार आहेत. या मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांकडून होईल. मात्र, अपक्षांसह इतर उमेदवारांकडेही बहुजन समाजातील मतदारांचा ओढा असेल, असे दिसून येते.
- राज्यातील २४ मतदारसंघात अल्पसंख्याक समाजातील ख्रिश्चन, मुस्लिम समाजातील मतदारांचे प्राबल्य.
- त्यांची एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी उमेदवारांकडून व्यूहरचना.
- `नुवे, बाणावली, वेळ्ळी, कुडतरी आणि कुंकळ्ळी या मतदारसंघात ५० टक्क्यांहून अधिक अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या.
- कळंगुट, सांत आंद्रे, कुठ्ठाळी, फातोर्डा, नावेली या मतदारसंघात ४० टक्क्यांपर्यंत ख्रिश्चन आणि मुस्लिम लोकसंख्या.
- मत विभागणीसाठी सर्व पक्ष, उमेदवारांचे प्रयत्न.