वेलनेस इकोसिस्टम मजबूत करण्यास गोवा कटिबद्ध: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:49 IST2026-02-19T12:48:31+5:302026-02-19T12:49:44+5:30
दुबईत आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेत सहभाग

वेलनेस इकोसिस्टम मजबूत करण्यास गोवा कटिबद्ध: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दुबई येथे आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय आयुष परिषद व प्रदर्शनाच्या समारोप समारंभास उपस्थित राहून संबोधले. वर्ल्ड आयुर्वेद फाउंडेशन व सायन्स इंडिया फोरमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेला केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संयुक्त अरब अमिरातीतील भारतीय दूतावासाचे अधिकारी, तसेच विविध देशांतील आयुषतज्ज्ञ उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'आयुष क्षेत्रात संशोधन, सहकार्य आणि वेलनेस इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी गोवा सरकार कटिबद्ध आहे. आयुष उपचारांचा अनुभव घेण्यासाठी जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यावर भर देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत एकात्मिक आरोग्य व्यवस्थेला जागतिक स्तरावर पुढे नेत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
पारंपरिक वैद्यक पद्धती ही केवळ सांस्कृतिक वारसा नसून वैज्ञानिक पुराव्यावर आधारित, प्रतिबंधात्मक, परवडणारी आणि सर्वांगीण आरोग्यसेवेचा प्रभावी मार्ग असल्याचे याप्रसंगी अधोरेखित करण्यात आले. जागतिक तज्ज्ञांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आयुष पद्धर्तीच्या आंतरराष्ट्रीय स्वीकाराला अधिक बळ मिळाल्याचे मत परिषदेत व्यक्त करण्यात आले. जागतिक स्तरावरील आयुषतज्ज्ञ, संशोधक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती लावली.