दक्षिण गोव्यासाठी अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प काळाची गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 17:07 IST2019-06-29T17:05:27+5:302019-06-29T17:07:47+5:30
गोव्यात सध्या कचऱ्याची समस्या बिकट बनलेली असून त्यामुळे पर्यटन क्षेत्रालाही धोका पोहचण्याची शक्यता आहे.

दक्षिण गोव्यासाठी अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प काळाची गरज
सुशांत कुंकळयेकर
मडगाव - गोव्यात सध्या कचऱ्याची समस्या बिकट बनलेली असून त्यामुळे पर्यटन क्षेत्रालाही धोका पोहचण्याची शक्यता आहे. दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात पर्यटन जोमात फोफावत असून त्या मानाने या भागात जो कचरा तयार होतो त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलीही प्रभावी योजना पुढे येत नाही.
सध्या गोव्याची बाजारपेठ असलेल्या मडगावाला कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे. या शहरात कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पात केवळ ओला कचरा घेणेच सुरू केल्याने दक्षिण गोव्यातील या शहरात ठिकठिकाणी कचऱ्याच्या राशी दिसू लागल्या आहेत. त्यामुळे या शहरात दुर्गंधीही पसरलेली आहे. दक्षिण गोव्यातील पर्यटन क्षेत्र याच शहराला जोडून असल्याने या ओंगळवाण्या दृश्याचा पर्यटनावरही विपरीत परिणाम होऊ लागला आहे.
दक्षिण गोव्यात मडगावला जोडून कोलवा, बाणावली, माजोर्डा,उतोर्डा, केळशी असे किनारे असून याच भागात मोठय़ा प्रमाणावर तारांकीत हॉटेलेही आहेत. या भागात देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा भाग पर्यटन क्षेत्र असूनही या भागातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलीही तजवीज न केल्याने या भागातील पंचायतीसाठी कचरा ही डोकेदुखी बनली असून या भागातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्वरीत तजवीज करण्याची गरज पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांकडून केली जात आहे.
काही वर्षापूर्वी उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागातही कचऱ्याची ही समस्या सतावत होती. मात्र या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळातर्फे साळगाव येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आल्याने उत्तर गोव्यातील समस्येवर काही प्रमाणात उपाय निघाला आहे. मात्र दक्षिण गोव्यात अजुनही या समस्येवर तोडगा काढलेला नाही. दक्षिण गोव्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या काणकोण तालुक्यातही वेगळी परिस्थिती नाही. ही गरज लक्षात घेता साळगावच्या धर्तीवर दक्षिण गोव्यासाठीही अत्याधुनिक कचरा प्रकिया प्रकल्प उभारण्याची गरज व्यक्त केली जात असून विशेषता पर्यटन भागाची गरज लक्षात घेऊन असा प्रकल्प ही सध्या काळाची गरज बनली आहे.