बाप रे! पावणेपाच कोटींची फसवणूक; गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा घालणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 11:45 IST2025-11-25T11:44:50+5:302025-11-25T11:45:46+5:30
फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

बाप रे! पावणेपाच कोटींची फसवणूक; गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा घालणाऱ्यास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोवा साइबर क्राइम पोलिसांनी ४.७४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या बनावट फसवणूक गुंतलेल्या एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्यावर फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
पणजीतील एका ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. भरमसा परतावा देण्याचे आमिष दाखवून संशयिताने गुंतवणूक करून घेतली होती. सूरज एकनाथ सावंत (रा. सावतवाडी-म्हासुर्ती, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) याला अटक केली.
संशयिताला कोठडी
या प्रकरणात एकूण तीन संशयितांची ओळख पटली असून त्यापैकी दोन जणांना अटक झाली आहे. तर एकास नोटीस बजावण्यात आली आहे. अटक केलेल्या संशयित सूरजला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
संशयित सूरजने संबंधित तक्रारदाराशी २५ ऑगस्ट २०२५ पूर्वी व्हॉट्सअॅप क्रमांक व यूट्यूब चॅनेलचा वापर करून 'पेटीएम मनी' या नामांकित गुंतवणूक संस्थेचा प्रतिनिधी असल्याचे भासविले होते. त्याने तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाला बनावट आयपीओ योजनेत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. मोठ्या प्रमाणावर शेअर्स वाटप झाल्याचे सांगून ४.७४ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली.
अन् पोलिस कोल्हापुरात पोहोचले
पोलिसांनी सखोल तांत्रिक व आर्थिक तपासानंतर आरोपीचा माग काढत महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे संशयिताचा ठावठिकाणा शोधला. पीएसआय मंदर देसाई, पोलिस कॉन्स्टेबल शांताराम नर्से व महेश गवडे यांच्या पथकाने संशयित सूरज सावंत (रा. सावतवाडी-म्हासुर्ली, जि. कोल्हापूर) याला अटक केली. तपासात उघड झाले की संशयिताने एका साथीदाराच्या बँक खात्यात ८० लाख रुपये स्वीकारले. नंतर ही रक्कम विविध खात्यांत वळवली. हे खाते महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात आणि गोवा अशा सहा राज्यांतील आठ सायबर फसवणूक प्रकरणांशी जोडलेले असून एकूण फसवणुकीची रक्कम १३.१० कोटी रुपये आहे. या प्रकरणात संशयिताचा साथीदार आविष्कार देवीदास सुरडकर (रा. बादनौर, जालना) याला अटक करून जामिनावर सोडण्यात आले. आणखी एक संशयित मलाथी बी. एन. हिची ओळख पटली असून तिच्या खात्यात लेयर एकमध्ये ३० लाख रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.