'फॉर्म्युला-४' बोगदा येथून रद्द: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; स्पर्धा गोव्यातच होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 09:29 IST2025-10-12T09:28:57+5:302025-10-12T09:29:40+5:30
लवकरच ठिकाण, तारखा जाहीर करू

'फॉर्म्युला-४' बोगदा येथून रद्द: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; स्पर्धा गोव्यातच होणार
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या 'फॉर्म्युला-४' या स्पर्धेचे बोगदा-सडा येथे आयोजन करण्यात येणार होते. मात्र, स्थानिकांसह नगरसेवकांचा वाढता विरोध लक्षात घेता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बोगदा येथे ही स्पर्धा होणार नसल्याचे शनिवारी जाहीर केले. तसेच ही स्पर्धा गोव्यात होईल. मात्र, त्याचे ठिकाण व तारखा लवकरच जाहीर करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शनिवारी मुख्यमंत्र्यांनी बोगदा येथे ज्या ठिकाणी 'फॉर्म्युला-४' होणार आहे, तेथे भेट देऊन रेसच्या मार्गाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी बायणा येथील रवींद्र भवनमध्ये नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांच्यासह नगरसेवकांशी या विषयावर चर्चा केली. या बैठकीला आमदार संकल्प आमोणकर, आमदार कृष्णा साळकरही उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'फॉर्म्युला-४' ही आंतरराष्ट्रीय दर्जाची कार रेसिंग स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या आयोजनामुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. तसेच राज्याला आर्थिकदृष्ट्याही लाभ होणार असल्याचे गोव्यातच आयोजनाचे निश्चित केले होते.
यापूर्वी मुरगाव तालुक्यात असा मोठा 'इव्हेंट' झाला नाही, म्हणून बोगदा हे ठिकाण स्पर्धेसाठी ठरवले. मात्र, स्थानिकांनी स्पर्धेला विरोध केल्यानंतर मी स्वतः जाऊन पाहणी केली व लोकांशी चर्चा केल्यानंतर बोगदा येथे स्पर्धा आयोजनाचा निर्णय रद्द केला आहे.
मी लोकांसोबत : आमोणकर
'फॉर्म्युला ४' या स्पर्धेमुळे मुरगाव तालुक्याच्या नावलौकिकात मोठी भर पडली असती. या स्पर्धेमुळे ज्या समस्या निर्माण झाल्या असत्या, त्यावर तोडगाही काढण्यात आला असता. मात्र, काहींनी राजकीय फायद्यासाठी लोकांमध्ये अफवा पसरविल्या. त्यामुळे आज मुरगाव तालुक्यातून जागतिक पातळीवरील स्पर्धा रद्द करण्याची वेळ आली आहे. काहींनी माझी राजकीय कोंडी करण्यासाठी या स्पर्धेला विरोध केला. मात्र, मी मतदारसंघातील जनतेसोबत असून, त्या नको ते मलाही नको, असे आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले.