माजी रणजीपटू, गोव्याचे माजी कर्णधार सुभाष कंगरलकर यांचे ७२व्या वर्षी निधन
By समीर नाईक | Updated: April 15, 2024 15:55 IST2024-04-15T15:55:00+5:302024-04-15T15:55:17+5:30
बेळगांव या त्यांच्या मूळ गावी पार्थिवावर करण्यात आले अंत्यसंस्कार

माजी रणजीपटू, गोव्याचे माजी कर्णधार सुभाष कंगरलकर यांचे ७२व्या वर्षी निधन
समीर नाईक, पणजी: गोव्याचे माजी रणजी कर्णधार सुभाष कंगरलकर यांचे सोमवारी हृदयविकराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. यावेळी ते ७२ वर्षाचे होते. मूळ बेळगाव येथील कंगरलकर सध्या वास्को येथे स्थायिक होते. बेळगाव येथेच त्यांच्या पार्थिवावर सोमवारीच अंत्यसंस्कार करण्यात आले. सुभाष कंगरलकर हे ८०च्या दशकातील एक उत्कृष्ठ अष्टपैलू क्रिकेटपटू होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी ३० पेक्षा अधिक सामने गोव्यासाठी खेळले असून, १ हजारपेक्षा जास्त धावा त्यांनी केल्या आहेत. त्यांची सर्वाधिक धावसंख्या नाबाद १३८ आहे.
सुभाष कंगरलकर हे चौगुले क्रिकेट क्लबचे अनेक वर्षे कर्णधार राहिले होते. नंतर त्यांनी क्लबचे व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले. आपल्या क्रिकेटच्या कारकीर्दीत त्यांनी ९० च्या दशकात अनेकदा गोवा रणजी संघाचे व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांनी अनेक दर्जेदार क्रिकेटपटू देखील तयार केलेत.
कंगरलकर यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे. कंगरलकर यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे, अशी माहिती मिळाली आहे.