प्रत्येक कार्यकर्त्याने वाजपेयींचा आदर्श जपणे गरजेचे: दामू नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 07:37 IST2025-12-29T07:37:21+5:302025-12-29T07:37:44+5:30
मुळगाव येथे अटल स्मृती संमेलनात भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन; आमदार शेट्ये यांची उपस्थिती

प्रत्येक कार्यकर्त्याने वाजपेयींचा आदर्श जपणे गरजेचे: दामू नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा आहेत, तसेच थोरपुरुषांची परंपराही असते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना देशाच्या वाटचालीत महान नेते म्हणून गणले जाते. त्यांनी केलेले कार्य अतिशय महान आहे आणि त्यांचा आदर्श प्रत्येक भाजप कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी आहे. साहित्यिक, वक्ता, कवी आणि लोकप्रिय नेते अशा अनेक क्षेत्रांत त्यांचे योगदान आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मुळगाव येथे केले.
मुळगाव येथे आयोजित अटल स्मृती संमेलन कार्यक्रमात त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावरील प्रमुख वक्ते गोरखनाथ मांद्रेकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, पद्माकर माळीक, महेश सावंत, कुंदा मांद्रेकर, दयानंद कारबोटकर, विजयकुमार नाटेकर, व डॉ. कौस्तुभ पाटणेकर उपस्थित होते. डॉ. कौस्तुभ पाटणेकर यांनी स्वागत भाषणात वाजपेयी यांच्या कार्याची माहिती दिली.
नव्या पिढीला त्यांच्या कार्याचा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. दोन खासदारांपासून १५ कोटी सदस्य, दीड हजार आमदारांचा मोठा प्रवास आहे. प्रखर वक्ता आणि राष्ट्रवादी गुणांनी परिपूर्ण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे जीवन प्रेरणादायी आहे. त्यांनी नैतिक मूल्ये आणि देशप्रेमाची भावना भाजप कार्यकर्त्यात घर करून दिली, असे गोरखनाथ मांद्रेकर यांनी सांगितले. यावेळी वल्लभ साळकर यांच्यासह वाजपेयी यांच्या काळातील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा पंचायत सदस्य पद्माकर माळीक, महेश सावंत आणि कुंदा मांद्रेकर यांचा सन्मानही करण्यात आला.
असामान्य कार्य : आमदार शेट्ये
आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये म्हणाले की, वाजपेयी हे अजातशत्रू व कवी मनाचे होते. त्यांनी देशात राजकारण आणि समाजकारण करताना अतिशय प्रामाणिकपणे काम केले आणि कार्यकर्त्यांची मजबूत सेना तयार केली. पंतप्रधान होऊन त्यांनी असामान्य कामगिरी केली. त्यांचा आदर्श आजच्या युवक, राजकीय नेत्यांनी स्वीकारून मार्गक्रमण करावे, असे आवाहन त्यांनी केले. आमदार प्रेमेंद्र शेटे म्हणाले की, माजी पंतप्रधान वाजपेयी यांनी भाजपला मोठी शक्ती, नवी ऊर्जा देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.