विरोधक एकत्र आले तरीही भाजपला धोका नाही : खासदार तानावडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:02 IST2026-01-02T10:01:31+5:302026-01-02T10:02:53+5:30
'लोकमत'च्या पणजी कार्यालयास तानावडे यांनी भेट दिली. त्यावेळी प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला.

विरोधक एकत्र आले तरीही भाजपला धोका नाही : खासदार तानावडे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधकांनाही मते मिळाली तरी, भाजप-मगो युतीच्या मतांच्या प्रमाणावर परिणाम झालेला नाही. झेडपी निवडणूक व विधानसभा निवडणूक हे दोन वेगळे विषय आहेत. येत्या २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांची युती झाली तरी, भाजपच्या यशावर परिणाम होणार नाही असा विश्वास खासदार सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला.
काल गुरुवारी 'लोकमत'च्या पणजी कार्यालयास तानावडे यांनी भेट दिली. त्यावेळी प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला. तानावडे म्हणाले की, सत्तरी, डिचोली, पेडणे आदी तालुक्यांमध्ये काँग्रेसचा पूर्ण सफाया झालेला आहे हे झेडपी निवडणुकीत दिसून आले. जिल्हा पंचायत निवडणूक, लोकसभेची निवडणूक व विधानसभा निवडणुकीची गणिते वेगवेगळी असतात. विरोधक एकत्र आले म्हणून मते ट्रान्सफर होत नसतात. भाजपची मते आहेत ती भाजपसोबतच राहतील, असा दावा तानावडे यांनी केला.
जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने खूप सदस्य निवडून आणले. काही ठिकाणी यश मिळाले नाही, पण तिथे पक्षाचे काम सुरुच राहणार. विरोधकांमध्ये मात्र काही ठिकाणी विजय होऊन देखील युती दिसली नाही. त्यांचे एक मत भाजपलाच मिळाले. यातून विरोधकांची स्थिती काय आहे हे दिसते. असे असले तरी आम्ही कोणतीही निवडणूक गांभीर्यानेच घेत असतो, असेही खासदार तानावडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दिल्लीत जास्त अनुभव मिळतो, पण...
राज्यातील राजकारण आणि दिल्लीतील राजकारण वेगळे आहे. दिल्लीत गेल्यावर तिथल्या नेत्यांशी बोलल्यावर जास्त अनुभव मिळतो, ज्ञानात भर पडते. व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. दिल्लीत मी खूप काही शिकलो. पण राहण्याच्या दृष्टीने गोवाच योग्य वाटतो. दिल्लीत प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. तसेच तिथले हवामान खुप त्रासदायक आहे. थंडी असली तर खूपच पडते, उकाडाही प्रचंड असतो, असे तानावडे यांनी सांगितले.
२०२७ मध्ये भाजपची सत्ता हाच संकल्प
राज्यसभेत कामाच्यादृष्टीने तिथे खूप चांगले व कठोर नियम आहे. प्रत्येक खासदाराची दर दोन तासांनी पक्षाकडून हजेरी घेतली जाते. अनुभवी राजकारणी राज्यसभेत असल्याने विषय मांडताना वेगळे दडपणही असते. पण येथे कुणी विषय मांडतो किंवा प्रश्न विचारतो त्या खासदाराला मंत्र्यांकडून तेवढाच मान मिळतो, असेही तानावडे यांनी सांगितले.
भाजपने प्रत्येक निवडणुकीत चांगले काम केले. भाजपमुळे आम्ही आहोत. २०२७ मध्ये भाजपला पुन्हा सत्तेवर आणणे हाच नव्या वर्षाचा संकल्प आहे. राज्याचे जेवढे प्रश्न राज्यसभेत मांडण्याची संधी मिळणार तेवढे प्रश्न मांडणार, असेही ते म्हणाले.
'कुशावती' जिल्ह्यामुळे नवीन खासदार मिळणार नाही. खासदार हा लोकसंख्येवरुन ठरवला जातो. पण येथे जिल्हा पंचायत उभी राहील. लोकांचा विकास बऱ्यापैकी होईल, नव्या साधनसुविधा तयार होतील. - सदानंद तानावडे, खासदार