दिव्या राणेंची मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा; पोलिसांच्या अटकसत्राविषयी आमदार नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 09:29 IST2025-10-23T09:28:36+5:302025-10-23T09:29:21+5:30
तूर्त होंड्यात वातावरण निवळले, पोलिसांच्या बदल्या शक्य

दिव्या राणेंची मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा; पोलिसांच्या अटकसत्राविषयी आमदार नाराज
लोकमत न्यूज नेटवर्क, सत्तरी : होंडा येथे पोलिसांनी संशयावरून दिवाळी सणादरम्यान प्रत्येकाला उचलून अटक करण्याचा सपाटा लावल्यानंतर पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे संतप्त झाल्या. त्यांनी या एकूण प्रकरणाबाबत व पोलिसांच्या एकतर्फी वर्तनाबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी काल सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांसमोर दिव्या राणे यांनी ग्रामस्थांची बाजू मांडली आहे. त्यानंतर पोलिसांचे अटकसत्र थोडे संथ झाले व गावातील वातावरणही निवळण्यास मदत झाली.
दरम्यान, सत्तरीतील काही पोलिसांच्या पुढील काही दिवसांत बदल्या होऊ शकतात, अशी माहिती मिळाली. सणादरम्यानच कारवाई केल्यामुळे लोकही धास्तावले होते.
पोलिसांनी खऱ्या संशयितांना मोकाट सोडून भलत्यांनाच गजाआड करण्याचे सत्र आरंभल्याने दिव्या राणे यांनी नाराजी व्यक्त केली. लहान मुले, हायस्कूल विद्यार्थ्यांना देखील पोलिस होंड्यात ताब्यात घेऊ लागल्याने मला बोलावे लागले, असे दिव्या राणे म्हणाल्या.
ग्रामस्थांना विनाकारण त्रास नको
आमदार दिव्या राणे यांनी काल मीडियासमोर आपली भूमिका मांडली. होंडा भाग पर्ये मतदारसंघात येतो. दिव्या राणे म्हणाल्या की, कारगाडी जाळण्याचा प्रयत्न करणारा सापडला नाही म्हणून पोलिस संशयावरून कुणालाही उचलून तुरुंगात टाकत होते. पोलिसांनी सिसीटीव्ही फुटेज नीट पाहायला हवीत. जो माणूस गर्दीत होता, त्या सर्वच माणसांना उचलून अटक करणे चुकीचे आहे. आपण हे मुद्दे माननीय मुख्यमंत्र्यांसमोर मांडले आहेत. पोलिसांनी विषय नीट हाताळावा, उगाच ग्रामस्थांना त्रास करू नये. सत्तरी तालुक्यात पोलिस अनेकदा विषय व्यवस्थित हाताळत नाहीत. पर्यंत देखील पूर्वी पोलिसांनी विषय नीट हाताळला नव्हता, असे दिव्या राणे म्हणाल्या.
पोके यांनी आरोप फेटाळला
दरम्यान, तक्रारदार रुपेश पोके यांनी रात्री एका व्हिडीओद्वारे आपले म्हणणे मांडले. पोलिस स्थानकात तक्रार करणाऱ्या रुपेश पोके यांचे असे म्हणणे आहे की, आमदार दिव्या राणे यांनी आपल्यावर केलेला आरोप पूर्णपणे चुकीचा व खोटा आहे.
पोके म्हणाले की, 'मी खंडणीखोर नव्हे. आमदाराच्या कुल देव आणि देवतेवर हात ठेवून मी शपथ घेतो की, मी कुठलीही खंडणी स्वीकारलेली नाही. ज्या कोणाला असे वाटत असेल, तर त्याने पुराव्यानिशी सिद्ध करावे. समाजात जे काही वाईट घडते, त्याविरुध्द नेहमीच मी आवाज उठवला आहे.
दिवाळीला नरकासुर प्रतिमा तयार करून पहाटे ४ वाजेपर्यत सर्वत्रच संगीत वाजवले जाते. मात्र, या व्यक्तीने त्या विरोधात पोलिसांत तक्रार केली व पोलिसांनी संगीत बंद पाडले. त्यानंतर पोलिस चौकीसमोर गाडी पेटवण्याचा जो प्रकार झाला तो चुकीचाच होता. मी त्याचे समर्थन करीत नाही. मात्र, पोलिसांनी योग्य तपास करणे अपेक्षित आहे. - डॉ. दिव्या राणे, आमदार पर्ये मतदारसंघ.