मनोकामना पूर्ण करणारी आषाढी एकादशी; पाहा, व्रताचा इतिहास, महत्त्व अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 12:59 IST2025-07-06T12:55:45+5:302025-07-06T12:59:32+5:30

पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वास आहे. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. वर्षभरातील २४ एकादशींपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे.

devshayani ekadashi 2025 know about ashadhi ekadashi which fulfills wishes see the history importance and recognition of vrat | मनोकामना पूर्ण करणारी आषाढी एकादशी; पाहा, व्रताचा इतिहास, महत्त्व अन् मान्यता

मनोकामना पूर्ण करणारी आषाढी एकादशी; पाहा, व्रताचा इतिहास, महत्त्व अन् मान्यता

- तुळशीदास गांजेकर, साखळी

आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी! वर्षभरातील २४ एकादशींपैकी या एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. आषाढी एकादशी व्रतामागील इतिहास आणि महत्त्व, पंढरपूरची वारी याविषयी...

आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला 'देवशयनी (देवांच्या निद्रेची)' आणि वद्य पक्षातील एकादशीला 'कामिका एकादशी' म्हणतात. पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार केले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. व्रत करण्यासाठी आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त राहायचे. एकादशीला प्रातः स्नान करायचे. तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा, रात्री हरिभजन करत जागरण करायचे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी 'श्रीधर' या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.

आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी। जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर!

'एकावर एक ११ म्हणजे एकादशी. याचा अर्थ एकत्व सोडू नये. या दिवशी लंघन करणे, उपवास करणे असा उद्देश आहे, लक्ष भगवंताकडे रहावे. अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर ! वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. त्यासंदर्भात एक ओवी आहे, आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी। संत नामदेव महाराजही आपल्या अभंगात सांगतात, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर! पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत. एक काशी आणि दुसरे पंढरपूर. कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्त्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे. काशीत शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे; म्हणूनच प्रत्येक हिंदू इहलोकाची यात्रा संपवण्यापूर्वी एकदा तरी काशीस अथवा पंढरपूरला जावे, अशी इच्छा प्रत्येकजण बाळगून असतो.

पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वास आहे. त्याच्या नामाविना त्यांचे कोणतेच कर्म होत नसते. अशा भगवद्भक्त वारकऱ्यांचा महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होतो. प्रत्येकाचे कल्याण चिंतणे, कार्यात भगवंताला पहाणे, धर्मपूर्वक गृहस्थाश्रमाचे पालन करणे आणि भागवतधर्माचा मार्ग सुकर करणे हेच वारकऱ्यांचे भक्तिमय जीवन असते!
 

Web Title: devshayani ekadashi 2025 know about ashadhi ekadashi which fulfills wishes see the history importance and recognition of vrat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.