'क्राइम ब्रँच'कडे तपास; पीडितांनी न घाबरता पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:49 IST2026-03-25T13:47:50+5:302026-03-25T13:49:13+5:30
गुन्हा अन्वेषण विभागाकडून त्याचा तपास सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

'क्राइम ब्रँच'कडे तपास; पीडितांनी न घाबरता पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, केपे/मडगाव : कुडचडे येथील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास आता गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित सोहम सुशांत नाईक या युवकाविरोधात पॉक्सो व बाल कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. सध्या संशयित सोहमला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सेक्स स्कँडलमध्ये त्याच्यासोबत आणखी काही जणांचा समावेश असल्याची चर्चा आहे. गुन्हा अन्वेषण विभागाकडून त्याचा तपास सुरू झाल्याचे सांगण्यात आले.
मडगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना, दक्षिण गोवा जिल्हा पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पीडितांचे आणि इतर संबंधितांचे जबाब नोंदवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तपासात जशी नवीन माहिती आणि पुरावे समोर येतील, त्याप्रमाणे आरोपीवर अधिक कलमे वाढवली जातील किंवा गरज पडल्यास नवीन एफआयआर देखील नोंदवला जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली. ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचे आणि तक्रार देण्यासाठी कोणीही समोर येत नसल्याचे तांत्रिक कारण पोलिसांनी पुढे केले होते. मात्र, पोलिसांच्या या भूमिकेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता.
पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने कुडचडेतील स्थानिक नागरिक आणि नगरसेवकांनी एकत्र येत पोलिस स्थानकावर धडक मोर्चा काढला होता. अखेर पोलिसांनी सोहम नाईकला अटक केली. न्यायालयाने संशयिताला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पीडितांची वैद्यकीय तपासणी
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात पीडितांपैकी चौघा युवतींच्या वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली. युवतींची ओळख गुप्त ठेवत ही प्रक्रीया पूर्ण करण्यात आली. दरम्यान, व्हायरल व्हिडिऑसह काही पुरावे पोलिसांनी जमा केले आहेत. त्यांची तांत्रिक पडताळणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बाल हक्क संरक्षण आयोगाचेही लक्ष
कुडचडेतील प्रकरणावर बाल हक्क संरक्षण आयोग लक्ष ठेवून आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी तसेच दक्षिण गोवा बालकल्याण समितीस योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत, असे आयोगाचे अध्यक्ष शशिकांत पुनाजी यांनी सांगितले.
सखोल तपास होणार : पोलिस अधीक्षक
पोलिस अधीक्षक संतोष देसाई म्हणाले की, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणातील पीडित युवतींनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे यावे. तक्रारदारांची माहिती आणि ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल. त्यांना पोलिस दलातर्फे पूर्ण संरक्षण देऊन या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल.
वर्षा शर्मा यांनी घेतला आढावा
दरम्यान, पोलिस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी मंगळवारी कुडचडे पोलिस स्थानकाला भेट दिली. त्यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला. शर्मा या दीड तास तेथे होत्या.
सोहमविरोधात दोन गुन्हे दाखल
पोलिसांनी सोहम नाईकविरुद्ध दोन गुन्हे नोंदवले आहेत. एका प्रकरणात, त्याने लग्नाच्या बहाण्याने युवतीशी संबंध प्रस्थापित केले आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याने तिचे व्हिडिओ शेअरही केले. दुसऱ्या प्रकरणात, सोहमने अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियाद्वारे मैत्री केली. तिला अश्लिल फोटो पाठवले. वैयक्तिक फोटो व्हायरल करू, अशी धमकी दिली. इतर मुलींची भेट घडवून आणण्यासाठी, संपर्क साधून देण्यासाठी त्याने या मुलीवर दबाव आणल्याचा आरोप आहे.
लैंगिक अत्याचारप्रकरणी एसआयटी स्थापन करा
कुडचडेतील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करावा, राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची स्वेच्छा दखल घ्यावी, अशी मागणी प्रदेश महिला कांग्रेसच्या अध्यक्षा डॉ. प्रतीक्षा खलप यांनी केली.
खलप यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्य महिला आयोगाला निवेदन सादर केले. 'गोव्यासारख्या राज्यात असा प्रकार घडणे, हे फार धक्कादायक आहे. महिला आयोगाने त्याची अद्यापही दखल घेतलेली नाही. या प्रकरणाचे गंभीर्य पाहता त्यांनी स्वेच्छा दखल घ्यावी, पीडितांची जाऊन भेट घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याविषयी डॉ. प्रतीक्षा खलप म्हणाल्या, 'महिला आयोगाच्या अध्यक्षा रंजिता पै यांचा कार्यकाळ ५ मार्च रोजी संपुष्टात आल्याने सध्या हे पद रिक्त आहे. आयोगाच्या सदस्य सचिव उपासना माजगावकर यांच्याकडे कारभार आहे. त्यांच्या नावे हे निवेदन दिले आहे. महिला तसेच अल्पवयीन मुलांवर अत्याचार होतो, तेव्हा महिला आयोग तसेच बाल आयोगाने त्याची दखल घेणे अपेक्षित असते. मात्र, दोन्ही आयोगांकडून कुठलीही हालचाल झाली नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणात त्याच्यासोबत आणखी कुणी सहभागी आहे का? याचाही तपास पोलिसांनी करावा, असे त्या म्हणाल्या.
...तर आमच्याकडे संपर्क करा
या लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित मुली तसेच महिलांना जर थेट पोलिसांत जाऊन तक्रार करण्यास भीती वाटत असेल तर त्यांनी प्रदेश महिला कांग्रेसकडे संपर्क साधावा. आम्ही नक्कीच त्यांना सहकार्य करू. तसेच गुप्तता पाळली जाईल, असे आवाहन डॉ. प्रतीक्षा खलप यांनी केले.