'युतीत फूट पडण्यास काँग्रेसच जबाबदार'; आम आदमी पक्षाची जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:20 IST2025-12-05T13:20:20+5:302025-12-05T13:20:44+5:30
काहीही झाले तरी आम्ही अस्थिर, अविश्वासू युतीसोबत जाणार नाही. काँग्रेस नेमके काय करते हे लोकांना कळू लागले आहे.

'युतीत फूट पडण्यास काँग्रेसच जबाबदार'; आम आदमी पक्षाची जोरदार टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सध्याची युतीची स्थिती पाहता आम्ही एकट्याने जिल्हा पंचायत निवडणूक लढवण्याचा जो निर्णय घेतला, तो योग्य ठरला. युतीत फूट पडण्यास काँग्रेसच जबाबदार आहे, असा आरोप आपचे राज्य निमंत्रक अॅड. अमित पालेकर यांनी व्यक्त केले. पणजीत गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आपचे राष्ट्रीय प्रवक्ते वाल्मिकी नायक व इतर मान्यवर उपस्थित होते.
पालेकर म्हणाले की, 'बिहार असो वा इतर राज्ये, काँग्रेसचा विश्वासघात हाच इतिहास आहे आणि गोवाही याला अपवाद राहिलेला नाही. काँग्रेसवर कधीच विश्वास ठेवता येणार नाही. आम्ही एकट्याने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तो योग्यच आहे. या निर्णयामुळे आम्ही काँग्रेस, गोवा
फॉरवर्ड आणि आरजी यांच्यापेक्षा एक पावलाने पुढे आहोत. ते युतीत गुरफटत राहिले. सकारात्मक आणि स्वच्छ राजकारण करून लोकांचे विषय हाताळणे हे आमच्या पक्षाचे उद्दिष्ट आहे. युती मात्र जागा वाटपाबाबत अधिक गोंधळात आहे.'
पालेकर म्हणाले की, सर्व मतदारसंघात उमेदवार उभे करणे सोपे नाही. त्यामुळे काही मतदारसंघांमध्ये आपच्या समविचारी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करू, अपक्ष उमेदवारांना पूर्ण स्वातंत्र्य असेल. काहीही झाले तरी आम्ही अस्थिर, अविश्वासू युतीसोबत जाणार नाही. काँग्रेस नेमके काय करते हे लोकांना कळू लागले आहे.