ज्येष्ठांच्या दुर्धर आजारांची काळजी घेण्यास वचनबद्ध: मुख्यमंत्री सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 09:48 IST2025-10-12T09:48:06+5:302025-10-12T09:48:25+5:30
साखळीत नॅपकॅमतर्फे राष्ट्रीय उपशामक काळजी अधिवेशन

ज्येष्ठांच्या दुर्धर आजारांची काळजी घेण्यास वचनबद्ध: मुख्यमंत्री सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : ज्येष्ठ धुर्धर आजाराने त्रस्त रुग्णांची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे. या रुग्णांना होणाऱ्या वेदनेमुळे संपूर्ण कुटुंबातील सदस्यांनाही वेदना होत असतात. राज्य सरकार समग्र उपचारांसाठी आयुर्वेद होमिओपॅथी आणि योगीक विज्ञानासह आधुनिक औषधांचे एकत्रीकरण करण्यास वचनबद्ध आहे. सरकारच्या उपशामक काळजी धोरण अंतर्गत गोव्यात केंद्र चालवणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना अडीच लाखांचे आर्थिक साहाय्य दिले जात आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांना धुर्धर आजार व वेदना जाणवणाऱ्या रुग्णांसाठी सहानुभूती हे प्रगतीचे खरे माप आहे. त्यांची सुश्रुशा करण्यासाठी समाजातील सर्व घटक डॉक्टर्स, नर्सेस यांच्या संघटित प्रयत्नांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या वेदनांवर फुंकर घालणे शक्य होत असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी साखळी येथे सांगितले. नॅपकॅम गोवा प्रभागातर्फे राष्ट्रीय पेलेटीव्ह केअर अर्थात ज्येष्ठ धुर्धर आजाराने त्रस्त रुग्णांची काळजी कशी घ्यावी या विषयावर राष्ट्रीय
परिषदेचे आयोजन साखळी येथील साई नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये केले होते.
राष्ट्रीय असोसिएशन ऑफ पेलेएटीव्ह केअर फॉर आयुष इंटिग्रेटिव्ह मेडिसिन गोवा, साई नर्सिंग इन्स्टिट्यूट, आयएमए चॅरिटेबल ट्रस्ट फोंडा यांच्या सहकार्याने ही राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. व्यासपीठावर डॉ. संतोष उजगावकर, पांडुरंग कुर्डीकर, संतोष मळीक, डॉक्टर वल्लभ धायमोडकर, डॉ. स्नेहा भागवत, अदिती सावंत, डॉ. दत्ताराम देसाई, डॉ. गीता जोशी व इतर उपस्थित होते.
४०० प्रतिनिधींची उपस्थिती
गोवा सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक साहाय्य देत असून समुपदेशन डॉक्टर, नर्सेस व इतर सर्व आवश्यक तरतुदी करत असल्याने रुग्णांची सुश्रुषा व आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना वेदना होत असताना दिलासा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. साई नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या सभागृहात आयोजित एकदिवसीय परिषदेला गोवा व इतर राज्यांतील ४०० प्रतिनिधी उपस्थित होते.