व्यावसायिक सिलिंडर २०० रुपयांनी महागला; दरवाढीने हॉटेलवाले संकटात, खाद्यपदार्थांचे दर वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 08:11 IST2026-04-02T08:11:33+5:302026-04-02T08:11:33+5:30
सध्या १,९५० रुपयांवरून २,१५१ रुपये दराने सिलिंडरची विक्री करण्यात येत आहे.

व्यावसायिक सिलिंडर २०० रुपयांनी महागला; दरवाढीने हॉटेलवाले संकटात, खाद्यपदार्थांचे दर वाढणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक क्षेत्राला मोठा झटका बसला असून, १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात १ एप्रिलपासून देशभरात २०० रुपयांपेक्षा अधिक वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या १,९५० रुपयांवरून २,१५१ रुपये दराने सिलिंडरची विक्री करण्यात येत आहे.
सरकारी तेल विपणन कंपन्या-इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम यांनी ही दरवाढ जाहीर केली आहे. या अचानक झालेल्या दरवाढीचा सर्वाधिक फटका हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांना बसणार आहे. आधीच गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त असलेल्या व्यावसायिकांपुढे आता खर्चाचा मोठा बोजा उभा राहिला आहे. परिणामी, अन्नपदार्थाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक गॅस दरांमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू होते. मात्र, नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच झालेली ही मोठी वाढ व्यापाऱ्यांच्या नाराजीचे कारण ठरली. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी यापूर्वीच गॅस टंचाईमुळे हॉटेल तात्पुरते बंद ठेवले होते.
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, व्यावसायिक गॅस महागल्याने त्याचा अप्रत्यक्ष परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होणार, हे निश्चित मानले जात आहे. हॉटेलमधील वाढलेले दर, पार्सल सेवा आणि इतर खाद्यसेवा महागल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञाच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन दरातील चढ-उतार, आयात खर्चात झालेली वाढ आणि चलनातील बदल यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काळातही दर स्थिर राहतील की आणखी वाढतील, याबाबत अनिश्चितता कायम आहे.
राज्यात सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी सिलिंडर मिळणे कठीण झाले असून, यामुळे व्यावसायिकांचे नियोजन कोलमडले आहे.
पीएनजी गॅसचा पर्याय
दरवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट, रॉक्स आणि ढाब्यांना पाइपलाइनद्वारे पीएनजी (पाइप्ड नॅचरल गॅस) पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन खाते, नागरी पुरवठा खाते, गॅस कंपन्या आणि हॉटेल व्यावसायिक यांच्यात नुकतीच बैठक पार पडली. संबंधित कंपन्यांनी लवकरात लवकर पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. ही सेवा प्रत्यक्षात कधी सुरू होणार आणि ती कितपत स्वस्त व उपलब्ध असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत मात्र वाढलेल्या गॅस दरांचा भार हॉटेल व्यावसायिक आणि ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.
६० टक्के पुरवठा उद्योगांना अनिवार्य
नागरी पुरवठा खात्याने राज्यातील सर्व तेल विपणन कंपन्यांना व्यावसायिक एलपीजी गॅसचा किमान ६० टक्के पुरवठा व्यावसायिक आस्थापनांना करण्याचे आदेश जारी केले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग सेवा तसेच इतर व्यावसायिक वापरासाठी एलपीजीचा नियमित व पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक क्षेत्राला गॅस उपलब्धतेबाबत दिलासा मिळणार आहे.