कोलवाळ कारागृहाची झाडाझडती; वॉर्डन निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 10:39 IST2026-01-11T10:38:24+5:302026-01-11T10:39:12+5:30
उच्च न्यायालयाने कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील कारभारावर नाराजी व्यक्त केल्यानंतर कारागृह प्रशासनाने कारागृहावर अचानक छापा टाकला.

कोलवाळ कारागृहाची झाडाझडती; वॉर्डन निलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : उच्च न्यायालयाने कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील कारभारावर नाराजी व्यक्त केल्यानंतर शनिवारी कारागृह प्रशासनाने कारागृहावर अचानक छापा टाकला. यावेळी ४० हून अधिक मोबाइल फोन, चार्जर, हेडफोन, तंबाखू, सिगारेटसह चरससारखे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. यावेळी अनेक सेलमधील चार्जिंग पॉइंट हटविण्यात आले.
या कारवाईच्या वेळी कैदी असलेल्या सर्व सेलची तपासणी करण्यात आली. यावेळी अनेक मोबाइल सापडले. त्याचबरोबर, मोठ्या प्रमाणावर फोन चार्जर, हेडफोन सापडले. काही सेलमध्ये जे चार्जिग पॉइंट होते, तेही हटविण्यात आले आहे. या कारवाईसाठी पोलिसांचा, तसेच आयआरबी पोलिसांचा वापर करण्यात आला होता.
कारवाईवेळी काही वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने कारागृहातील एकूण कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. कारागृहात जॅमर बसवण्याचे आणि चार्जिंग पॉइंट काढून टाकण्याचे, तसेच सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. याचा अहवाल, पुढील सुनावणीवेळी सादर करण्यासही सांगण्यात आले होते.
वॉर्डन निलंबित
दरम्यान, सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवरून तुरुंग विभागाकडून कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील जेल वार्डन लक्ष्मण पडलोस्कर याला निलंबित केले आहे. व्हिडीओमध्ये लक्ष्मण पडलोस्कर हा हिस्ट्रीशीटर अमोघ नायक याच्या जामीन मंजुरीनंतर आनंद साजरा करताना दिसत आहेत. हा प्रकार जेल प्रशासनाच्या शिस्त आणि आचारसंहितेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करतो. तुरुंग विभागाच्या पोलिस अधीक्षक सुचेता देसाई यांनी निलंबनाची पुष्टी केली असून, या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू आहे.