गोव्यात प्रशासन कोलडमल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 18:20 IST2018-09-07T18:15:57+5:302018-09-07T18:20:43+5:30
काँग्रेस आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट

गोव्यात प्रशासन कोलडमल्याचा दावा
पणजी : गोव्यात प्रशासन कोलमडल्याने राज्यपालांनी आपले घटनात्मक अधिकार वापरुन पर्रीकर सरकावर कारवाई करावी आणि काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेस आमदार, पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज दुपारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची राजभवनवर भेट घेऊन केली. गेल्या सहा महिन्यात काँग्रेसी शिष्टमंडळ तिसऱ्यांदा राज्यपालांना भेटले आहे.
भेट घेऊन परतल्यानंतर विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यात सरकार अस्तित्त्वात नसल्याचा दावा केला. ते म्हणाले की,‘विकासकामे ठप्प झालेली आहेत. केवळ महामार्गांचे तेवढे काम दिसते. राज्यात उर्वरित ठिकाणी कोणतीही विकासकामे झालेली नाहीत. केरळमध्ये प्रलयंकारी पुराने झालेल्या हानीत त्या राज्याला १५ वर्षे मागे नेले. गोव्यात सरकार आजारी पडल्याने विकास खुंटला असून राज्याला मागे नेले आहे. अनेक ज्वलंत प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्यायला सरकार तयार नाही. मुख्यमंत्र्यांसह तीन आमदार आजारी असून सरकारचे कामच ठप्प झाले आहे आणि विकासाला खीळ बसला आहे.’
काँग्रेसचे १६ पैकी ९ आमदार या शिष्टमंडळात उपस्थित होते. यात विरोधी नेते कवळेकर यांच्यासह दिगंबर कामत, रवी नाईक, नीळकंठ हळर्णकर, विल्फ्रेड डिसा, जेनिफर मोन्सेरात, इजिदोर फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्स व क्लाफासियो डायस यांचा समावेश होता. काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार तसेच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हेही उपस्थित होते.
भाजपचे आमदार संपर्कात : चेल्लाकुमार
चेल्लाकुमार यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेसचे सर्व सोळाही आमदार एकसंध असल्याचा व उलट भाजपचेच अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, भाजप आमदार सरकारच्या कारभाराला कंटाळले आहेत आणि ते काँग्रेसमध्ये येऊ पहात आहेत. काँग्रेसी आमदार फुटणार असल्याच्या अफवा भाजपच पसरवित असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सभापतींनी झेंडावंदन केल्याने त्यास आक्षेप घेऊन चेल्लाकुमार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत क्रमांक दोनच्या किंवा अन्य मंत्र्याकडे ही जबाबदारी यायला हवी होती. सभापतींनी झेंडावंदन केल्याने त्यांचा पक्षपात सिध्द झालेला आहे त्यामुळे प्रमोद सावंत यांनी सभापतीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही चेल्लाकुमार यांनी केली.