'माझे घर'ची राज्यभर जागृती मुख्यमंत्र्यांची भाजप कार्यकर्त्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 07:32 IST2025-10-11T07:31:34+5:302025-10-11T07:32:55+5:30
मये, डिचोलीतून सोमवारपासून मोहीम

'माझे घर'ची राज्यभर जागृती मुख्यमंत्र्यांची भाजप कार्यकर्त्यांना सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा भाजपकडून 'माझे घर' ही योजना लोकांपर्यंत पोचवण्याबरोबरच जागृती करणार आहे. सोमवारी (दि. १३) मये व डिचोली येथून त्याची सुरुवात होईल. राज्यातील अन्य भागांतही ही जागृती केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत न्यांनी दिली. पणजी येथे भाजप कार्यकर्त्याच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यांशी बोलत होते.
भाजप कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत माझे घर, जीएसटी उत्सव, केंद्र व राज्य सरकारच्या योजना आदींच्या प्रसाराबाबत सूचना करण्यात आली. राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, 'माझे घर योजनेबाबत भाजपकडून जागृती केली जाईल. योजना नक्की काय आहे ते लोकांना समजावण्यात येईल. १९७२ सालापासूनची सरकारी जागेतील, कोमुनिदाद जागेवरील घरे सरकार या योजनेतून नियमित करणार आहे. माझे घर योजनेचे अर्ज सोमवारपासून उपलब्ध होतील. त्यानुसार ज्या लोकांची घरे नियमित करायची आहेत, त्यांनी आपल्या घरांची कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत व अर्ज सादर करावा. भाजप कार्यकर्ते लोकांना योजनेची माहिती देऊन ती समजावूनही सांगतील.'
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, 'केंद्र व राज्य सरकारच्या योजना, माझे घर योजना, जीएसटीचे दर कमी केल्याने झालेले फायदे, आत्मनिर्भर भारत योजनेसंदर्भातील संमेलने आदींबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. माझे घर योजनेची जागृती सोमवारपासून केली जाईल. गोमंतकीयांसाठी ही योजना खऱ्या अर्थाने सरकारने दिलेली दिवाळीची भेट असेल. त्यांची घरे नियमित होतील. भाजप कार्यकर्ते योजनेचे फायदे तसेच माहिती लोकांपर्यंत पोहोचवतील.
भाजपला फरक पडत नाही
सध्या आम आदमी पक्ष व काँग्रेस या दोन पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे. मात्र, या वादाचा भाजपला कोणताही फरक पडत नाही. कारण आम्ही एकसंघ आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माझे घर योजनेच्या शुभारंभानिमित झालेली सभा ही त्याचेच उदाहरण आहे' असे दामू नाईक यांनी सांगितले.
निवडणुकीसाठी नेहमीच तयार
एका प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, 'निवडणुकीसाठी भाजप पक्ष हा नेहमीच तयार असतो. पक्ष ३६५ दिवसही काम करतो. निवडणुकीत विजय प्राप्त केल्यानंतर विश्रांती घेत नाही. उलट पुढील निवडणुकीच्या तयारीला पक्ष लागतो.