पणजी : गोव्यात सध्या नाताळ सणाचा माहोल असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण संचारले आहे. अशा वातावरणात पोलीस तरी या सणाचा आनंद लुटण्यासाठी कसे बरेच दूर राहतील? जगाच्या नकाशावर लौकिक मिळवलेल्या कळंगुट किनारा पोलीस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी व त्यांच्या सहकारी पोलिसांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने नाताळ साजरा केला. परिसरातील वृद्धाश्रमांना तसेच अनाथ आश्रमांना भेट देऊन तेथे असलेल्या ज्येष्ठ नागरिक व बेवारस मुलांना नाताळानिमित्त भेटवस्तू दिल्या. कांदोळी येथील वृद्धाश्रमास त्यांनी भेट दिली त्यावेळी तेथील वृद्धांच्या डोळ्यात अश्रू तरळले. चादरी, टॉवेल, साबण, टूथ ब्रश अशा दैनंदिन गरजेच्या वस्तू या वृद्धांना भेट म्हणून देण्यात आल्या. दळवी यांच्यासह सहकारी पोलिसांनी यावेळी सांताक्लॉजच्या टोप्या परिधान केल्या होत्या. निरीक्षक दळवी यांनी स्वतः सांताक्लॉज बनून या भेटवस्तू वाटल्या. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांबरोबर नाताळ सणाची कॅरोल गाणी म्हटली. कांदोळी येथील प्रोवेदोरियाच्या वृद्धाश्रमास तसेच आर्च ऑफ होप या संस्थेच्या वृद्धाश्रमास भेट देण्यात आली. कळंगुट येथील सेंट अन्थोनी अनाथाश्रमात भेट देऊन येथील मुलांना मिठाई, स्नॅक्स, स्टेशनरी साहित्य दिले व त्यांच्याबरोबर नाताळची कॅरोल गाणीही म्हटली.
कळंगुट पोलिसांचा अभिनव 'नाताळ', वृद्धाश्रमांना आणि अनाथाश्रमांना दिल्या भेटवस्तू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 23:54 IST