नाकाबंदी करा, गस्त वाढवा!; मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना बजावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 09:30 IST2025-11-20T09:30:52+5:302025-11-20T09:30:52+5:30
दरोड्यासह इतर गुन्ह्यांचा छडा लावण्याची सक्त ताकीद

नाकाबंदी करा, गस्त वाढवा!; मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना बजावले
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात सुरू असलेल्या दरोड्यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूभीवर मुख्यंमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल, बुधवारी पोलिस अधिकाऱ्यांशी आल्तिनो येथील राजपत्रित अधिकारी सभागृहात तातडीची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यात होत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवरून पोलिसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि अधिकाऱ्यांना समजही दिली. गुन्हेगारांचा कसून शोध घेण्यासाठी नाकाबंदी, झाडाझडती आणि रात्रीची गस्त वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत पोलिस महासंचालक, महानिरीक्षक यांच्यापासून ते पोलिस निरीक्षक पदापर्यंतचे सर्व अधिकारी होते. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुन्हेगारीचा आढावा घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सर्वांनाच समज दिली तसेच सततचे दरोडे आणि त्यांना पकडण्यात आलेले अपयश यामुळे लोकांत भीती निर्माण झाल्याचे सांगून पोलिसांच्या कामगिरीबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली.
बैठक आटोपून बाहेर पडताना मुख्यमंत्री माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासठी पोलिसांना गंभीर होण्याचे आदेश दिले आहेत. दरोडोखोर पकडले जातील, सर्वत्र नाकाबंदी करण्याचा तसेच रात्रीच्यावेळी गस्ती वाढविण्यास सांगण्यात आले आहे. उद्यापासून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना पकडून आणून चौकशी करण्याचे सत्रही सुरू केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच ओळखपत्रे तपासणे आणि संशयावरून पकडून आणणे, अशी कारवाई सुरू केली जाईल असेही ते म्हणाले.
रासुका लागू करूनही...
राज्यात कायद्याची भिती राहावी यासाठी सरकारकडून राष्ट्रीय सुरक्षा कायदा तीन महिन्यांसाठी लागू करण्यात आला आहे. हा कायदा लागू करण्यात आल्यानंतरही गुन्हेगारांना भिती वाटत नाही काय? असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, ती भिती आता निर्माण होईल.
निरीक्षकांना धरले धारेवर
कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या या बैठकीत मुख्यमंत्री कधी नव्हे इतके नाराज दिसत होते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही समज दिली तसेच प्रत्यक्ष पोलिस स्थानकाची जबाबदारी असलल्या निरीक्षकांची मात्र अधिकच हजेरी घेतली. आपल्या कार्यक्षेत्राची सुरक्षा संबंधित पोलिस स्थानकाची जबाबदारी असल्यामुळे जबाबदार अधिकारी बना आणि गांभिर्याने काम करा, असेही त्यांना सुनावण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
३५ लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोर गेले तरी कुठे?
वास्को : बायणा येथील चामुंडी आर्केड इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये मंगळवारी दरोड्याची घटना घडली. यात सागर नायक यांच्यासह त्यांची पत्नी व मुलीला बेदम मारहाण करून दरोडेखोरांनी रोख रक्कमेसह सुमारे ३५ लाखांचा ऐवज लुटून नेला. या घटनेला जवळपास दोन दिवस उलटले तरी पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागलेले नाहीत. दरोडेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सागर नायक यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गेल्या २४ तासांत अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र अद्याप मागमूस लागलेला नाही.
गोव्यात शिरतानाच गुन्हेगार जेरबंद करा : श्रीपाद नाईक
राज्यात दरोडे व इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने राज्य सरकारला हे गुन्हे रोखण्यासाठी धोरण ठरवावे लागेल, असे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे. दरोड्यांच्या घटनांनी गोवा हादरला जात आहे. गुन्हेगारांची ताकद वाढली आहे हे नाकारून चालणार नाही. गुन्हे घडल्यानंतर काही करण्यापेक्षा आधीच प्रतिबंधात्मक उपाय करायला हवी. गुन्हेगारांची ताकद वाढली आहे, त्यामुळे असे काही उपाय करता येतील की गुन्हेगार गोव्यात शिरतानाच त्यांना जेरबंद करावे, असेही ते म्हणाले.