भाजपकडून फुटीचे राजकारण: माणिकराव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 13:35 IST2025-07-06T13:35:09+5:302025-07-06T13:35:50+5:30
नावेली जिल्हा पंचायत सदस्य एडविन कार्दोझ काँग्रेसमध्ये

भाजपकडून फुटीचे राजकारण: माणिकराव ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : आरएसएस समर्थित भाजप सरकारने कोणत्या प्रकारचे फुटीर राजकारण केले आहे याची गोमंतकीयांना जाणीव आहे. सरकारला राज्यातील विकास आणि मूलभूत सुविधा पुरवण्याची अजिबात काळजी नाही. राज्यातील रस्ते आणि मूलभूत सुविधांची दुरवस्था झाली आहे, अशी टीका काँग्रेसचेगोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली. शनिवारी संध्याकाळी नावेली जिल्हा पंचायत सदस्य एडविन कार्दोझ (सिप्नु) यांनी नावेलीतील इतर प्रमुख व्यक्तींसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी ठाकरे बोलत होते.
या पक्ष प्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार विरियातो फर्नाडिस आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, की नावेलीच्या जनतेने आगामी निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा द्यावा. गेल्या निवडणुकीत दक्षिण गोव्याच्या खासदाराला मतदान केल्याप्रमाणे काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावे. खासदार फर्नांडिस यांनी सांगितले, की राजकारणी लोकांना कसे मूर्ख बनवत, हे नावेलीतील लोकांनी लक्षात घ्यावे. जनतेने काँग्रेस पक्षासोबत राहावे आणि येणाऱ्या निवडणुकीत नावेली मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडून द्यावे. यावेळी पाटकर म्हणाले की, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी लोकांना अनेक आश्वासने दिली होती आणि त्यावेळी लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून भाजपला मतदान केले पण त्या बदल्यात भाजपने त्यांची फसवणूक केली. २०१७ मध्येही भाजपने सत्तेत येण्यासाठी कसे खालच्या पातळीवरचे डावपेच खेळले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, नावेली मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल. यावेळी लोकांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यावा आणि भाजपच्या पोकळ आश्वासनांना बळी पडू नये.
एडविन कार्दोझ यांनी सांगितले की, मी खूप दिवसांपासून काँग्रेस पक्षात सामील होण्याचा विचार करत होतो. बरेच लोक मला काँग्रेस पक्षात सामील होण्याचे सांगत होते आणि आता मी सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. काही लोक मतदारांमध्ये फूट पाडण्याचा आणि भाजपला विजय मिळवून देण्यात भूमिका बजावण्याचा विचार करत आहेत. परंतु यावेळी आपण सतर्क राहिले पाहिजे आणि अशा योजना यशस्वी होऊ देऊ नयेत.
खासदार फर्नांडिस म्हणाले, की भाजप सरकार गोवा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. गोव्यातील डोंगर नष्ट करून त्या जागी मोठमोठे प्रकल्प आणले जात आहे. कोळसा वाहतूक वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकांनी भाजपचा हा डाव वेळीच ओळखावा व त्याला विरोध करावा.