लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: राज्यात विविध प्रकारचे गुन्हे रोज घडत आहेत. रस्त्यांवर वाहनांकडून गोमंतकीयांना ठोकरून पळ काढला जातो. शिवाय किनारी भागात व अन्यत्र हॉटेलमध्येही चोरटे घुसून चोऱ्या करू लागले आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे सत्ताधारी भाजपचे देखील काही आमदार चिंतीत झाले आहेत. तेही धास्तावले आहेत. राज्यात जे लाखो परप्रांतीय भाड्याने राहतात, त्यांची पोलिसांनी कडक तपासणी करावी व सगळे रेकॉर्ड डिजिटल व अद्ययावत ठेवावेत, अशी मागणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केली आहे.
आमदार लोबो म्हणाले की, 'पोलिसांनी तपासणी सुटसुटीत करावी. डिजिटल सेवेचा वापर करावा. राज्यातील पोलिस स्थानकांवर तपासणीची यंत्रणा नाही. पोलिसांच्या सुविधाही वाढवा.
सीसीटीव्ही फूटेज दिले, तरीही...
हणजूण येथील आपल्या हॉटेलमध्ये झालेल्या चोरी प्रकरणात तीन दिवसांपूर्वी पोलिसांना सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध करून देण्यात आले. तरीसुद्धा चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. त्याचा फोटोही पोलिस रेकॉर्डमध्ये आढळलेला नाही. त्यावरून पोलिस यंत्रणा कशा पद्धतीने काम करीत आहे हे स्पष्ट होते.
हे करायला हवे
राज्यातील गुन्हेगारी प्रकार नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. किनारी भागातील पंचायतींना विश्वासात घेणे गरजेचे. महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे सक्तीचे करावे.
राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होऊ नये, महिलांवर होणारे अत्याचार कमी व्हावेत यासाठी विविध उपाययोजना गरजेच्या आहेत. हॉटेल व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी प्रक्रिया सुटसुटीत, डिजिटल पद्धतीने ऑलनाइन करावी. नोंदणीसाठी अॅप तयार करण्यात यावे. पोलिस तपासणी कार्ड सर्व स्थलांतरितांसाठी सक्तीचे करावे. स्थलांतरितांचा डेटा तयार करावा. - मायकल लोबो, आमदार.