बर्च अग्नितांडव: माजी सरपंच, सचिवासह १३ जणांविरूद्ध आरोपपत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:56 IST2026-02-27T12:55:26+5:302026-02-27T12:56:16+5:30
खबरदारी न घेतल्याने दुर्घटना घडल्याचे तपासात स्पष्ट

बर्च अग्नितांडव: माजी सरपंच, सचिवासह १३ जणांविरूद्ध आरोपपत्र
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा/हणजूण : हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या क्लबमध्ये ६ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या अग्निकांडप्रकरणी हणजूण पोलिसांनी १३ संशयितांविरुद्ध तब्बल ४,१५० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले. या आरोपपत्रात ३०५ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात गुरुवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात मुख्य संशयित व क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा, अजय गुप्ता, हडफडेचे तत्कालीन सरपंच रोशन रेडकर, बडतर्फ सचिव रघुवीर बागकर यांच्यासह १३ संशयितांवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवला आहे.
हडफडेतील क्लबमध्ये लागलेल्या आगीत ५ पर्यटकांसह २५ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हणजूण पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर यांच्या तक्रारीनुसार हणजूण पोलिसांनी क्लबचे मालक, भागीदार, व्यवस्थापक, इव्हेंट ऑर्गनायझर, व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी अटक केलेल्या संशयितांपैकी गौरव लुथरा (४४, रा. दिल्ली) आणि सौरभ लुथरा (४०, रा. दिल्ली) यांना थायलंडमधून अटक करून भारतात आणले होते. आणखी एक सह भागीदार अजय गुप्ता (५५, रा. गुरगाव हरियाणा) याला दिल्लीतून अटक केली होती. हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. तिघेही संशयित 'मे. बिईग जीएस हॉस्पिटॅलिटी गोवा आर्पोरा एलएलपी' आणि 'बर्च बाय रोमिओ लेन' या बार अँड रेस्टॉरंट क्लबचे भागीदार मालक आहेत.
अन्य संशयित
क्लबचा कॉर्पोरेट जनरल मॅनेजर राजीव मोडक (४९, रा. नवी दिल्ली), जनरल मॅनेजर विवेक सिंग (२७, रा. उत्तर प्रदेश), विजयकुमार सिंग (३८, झारखंड), हडफडे-नागवाचे तत्कालीन सरपंच रोशन रेडकर (४६, रा. हडफडे) आणि तत्कालीन बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर (४९, रा. मयडे), के-डान्स इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक मयूर कोलवाळकर (रा. अल्त पर्वरी) आणि जनरल मॅनेजर मोहम्मद अफीफ अब्दुलसाहब बातेरी (रा. आल्त पर्वरी) हे न्यायालयीन कोठडीत आहेत. क्लबचा गेट मॅनेजर प्रियांशू ठाकूर (३२, नवी दिल्ली), बार मॅनेजर राजवीर सिंघानिया (३२, गोरखपुर, उत्तर प्रदेश) हे सध्या जामिनावर मुक्त आहेत.
या कलमांतर्गत गुन्हे
बर्च क्लबमध्ये प्रतिबंधक सुरक्षा यंत्रणेचा अभाव असणे, क्लबला आपत्कालीन दरवाजांची सोय नसणे, बार अँड रेस्टॉरंट नाइट क्लब कोणत्याही योग्य परवान्यांशिवाय सुरू ठेवणे अशा अनेक कारणांवरून भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार १०५, १२५, १२५ (अ), १२५ (ब), २८७, आर/डब्ल्यू ३(५) या कलमांतर्गत तसेच ३३८, ३३६(३), ३४०(२), ६१ (२), २३८, २४१, ३ (७) कलमांतर्गत या १३ संशयितांविरोधात गुन्हा नोंदविले आहेत.
सुरेंद्र कुमार खोसला अद्याप फरार
क्लबमधील आग प्रकरणातील तेरावा संशयित असलेला क्लबच्या जागेचा मालक ब्रिटिश नागरिक सुरेंद्र कुमार खोसला (७८, रा. हडफडे) हा सध्या फरार आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी अजामिनपत्र अटक वॉरंट बजावले आहे. त्याच्या अटकेसाठी ब्ल्यू कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली आहे.
सव्वादोन महिन्यांचा तपास
अग्निकांडात २५ जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सव्वा दोन महिन्यांच्या तपासानंतर आरोपपत्र दाखल केले आहे.
घटनेनंतर लुथरा बंधूनी परदेशात पलायन केले होते. गुरुवारी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले तेव्हा काही संशयित उपस्थित होते. या संशयितांना आरोपपत्र देण्यात आले. अॅड. राजू पोवळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून प्रत्येक संशयिताला समन्स पाठवण्यात येणार आहे.
क्लबमध्ये कार्यक्रम आयोजित करताना गंभीर घटना घडू शकते, त्यातून ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांना मृत्यू होण्यासारखा प्रकार ओढवू शकतो, याचे भान असूनही कार्यक्रमाचे आयोजन केल्याचा ठपका संशयितांवर ठेवण्यात आला आहे. क्लबला योग्य परवान्यांविना असल्याचेही तपासात उघड झाले.