बायणा दरोड्याचा छडा, पाच संशयितांना पकडले; काही मुद्देमाल जप्त केल्याचा पोलिसांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:47 IST2025-11-26T11:44:13+5:302025-11-26T11:47:04+5:30
मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की सातपैकी तीन दरोडेखोरांना गोव्याबाहेर पकडण्यात आले आहे.

बायणा दरोड्याचा छडा, पाच संशयितांना पकडले; काही मुद्देमाल जप्त केल्याचा पोलिसांचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बायणा - वास्को येथील चामुंडी आर्केडमधील सागर नायक यांच्या फ्लॅटवर दरोडा टाकणाऱ्यांपैकी ५ दरोडेखोरांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी एकूण पाच जणांना अटक केल्याचे रात्री उशीरा सांगितले. दरम्यान, तीन संशयितांना पकडल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी रात्री दिली होती.
मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की सातपैकी तीन दरोडेखोरांना गोव्याबाहेर पकडण्यात आले आहे. पोलिस महासंचालकांनी याबाबत मला नुकतीच माहिती दिली. मात्र, याबाबतची सविस्तर माहिती अजून मी घेतलेली नाही. उर्वरित दरोडेखोरही पकडले जातील. सध्या पकडलेल्या दरोडेखोरांना गोव्यात आणले जात आहे. आज, बुधवारी याबद्दल माहिती सांगणे शक्य होईल. या प्रकरणाचा छडा लावला जाईल आणि सर्व दरोडेखोर पकडले जातील, याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला.
दरम्यान, पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी ५ संशयितांना अटक करून काही मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाल्याचे सांगितले.
मुरगाव पोलिसांना नागरिकांनी विचारला जाब
बायणा येथील चामुंडी आर्केड या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील सागर नायक यांच्या फ्लॅटवर पडलेल्या दरोड्यातील आरोपींना आठ दिवस उलटूनसुद्धा गजाआड करण्यास पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी मंगळवारी मुरगाव पोलिस स्थानकावर धडक दिली पोलिसांच्या संथ तपासाचा यावेळी नागरिकांनी निषेध केला. दरोडेखोरांनी मुरगाव पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उपस्थित नव्हते. या दरोडेखोरांना पुढील दोन दिवसांत गजाआड करण्यास अपयश आल्यास त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.
नागरिकांच्या संतप्त भावना
दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याबद्दल तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. यावेळी नागरिक पोलिस निरीक्षक शेरीफ जॅकिस यांना निवेदन देणार होते. मात्र निरीक्षक जॅकिस उपस्थित नव्हते. यावेळी मुरारी बांदेकर, शंकर पोळजी, जयेश शेटगावकर यांसह नागरिकांनी पोलिसांच्या तपासाच्या संथ गतीवर टीका केली. दरोडेखोरांचा शोध लावण्यात पोलिस अपयशी ठरल्याचा आरोप करत निषेध केला. राज्यात दरोडे वाढत आहेत. अनेक प्रकरणात आरोपींना गजाआड करण्यास पोलिसांना अपयश येते ही दुर्दैवी बाब असल्याचे नागरिकांनी सांगितले.